वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून साचले हिमकण
महाबळेश्वर – महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून वेण्णा लेक परिसरात आज दवबिंदू गोठल्याने हिमकण जमा झाले होते. वेण्णा लेक जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचलेले दिसत होते. थंडीच्या या हंगामात प्रथमच हिमकण दिसल्याने लोकांना त्याचे कुतूहल वाटत होते. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये आज किमान तापमान 10 अंश सेल्सिअस होते. वेण्णा तलाव परिसरात ते 4 ते 5 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
महाबळेश्वरमध्ये गेले तीन दिवस कडाक्याची थंडी पडली असून थंडगार वारे वाहत होते. काल (दि. 16) रात्री वारे कमी झाले तरी थंडीचा जोर होता. स्थानिक लोक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत होते. हवामान खात्याच्या नोंदीनुसार बुधवारी (दि. 15) किमान तपमान 12.9 अंश, गुरुवारी (दि. 16)10.8 अंश आणि आज या हंगामातील सर्वात कमी म्हणजे 10 अंश सेल्सिअस होते.
गेल्या तीन दिवसांच्या थंडीमुळे वेण्णा तलाव परिसरातील गारठा चांगलाच वाढला होता. या परिसरात आज दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. या सुंदर दृश्याचा पर्यटकांनी आनंद घेतला. वेण्णा तलावाच्या जेटीवर हिमकण साचले होते. हे हिमकण गोळा करण्याचा आनंद अनेक लोकांनी घेतला. थंडीच्या या हंगामात हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.