महापालिकेचा उपक्रम : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे – “जॉगिंग’ला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठी काही केल्याचे समाधान मिळेल, या संकल्पनेतून महापालिकेने “प्लॉगिंग’ ही संकल्पना मांडली असून, महापालिकेने “प्लॉगेथॉन’च्या माध्यमातून “प्लॉगिंग ड्राइव्ह’चे आयोजन केले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याविषयी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.
“प्लॉगिंग’ या शब्दाची व्याख्या “ए कॉम्बिनेशन ऑफ जॉगिंग विथ पिकींग अप लिटर’ अशी केली जाते. चार हजार जणांनी एकत्र “प्लॉगिंग’ केल्याचा जागतिक विक्रम मेक्सिकोच्या नावावर आहे. हीच संकल्पना भारतातही स्वीकारली जात असल्याचे, मोहोळ म्हणाले.
पुण्यामध्ये 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 7 या वेळेत प्रत्येक प्रभागात किमान दोन किमीचा “प्लॉगेथॉन’ मार्ग असणार आहे. सोबत दिलेल्या प्लॉगेथॉन मार्गावरील कचऱ्याचे संकलन करायचे आहे. कचरा संकलनासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने बकेटची व्यवस्था करायची आहे.
प्लॉगेथॉनच्या मार्गासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असणाऱ्या उद्यानांमध्येही याच प्रकारे सकाळी 7 ते 9 या वेळेत उद्यानात असलेले नागरिक, हास्यक्लबचे सदस्य यांना सहभागी करून घेऊन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रभागात महापालिका सभासद, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, गणेश मंडळे, मोहल्ला कमिटी सदस्य, बचत गट, प्रतिष्ठित व्यक्ती, लेखक, नाटककार, अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू, आमदार आणि खासदार यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
268 किमी अंतराचा हा प्लॉगिंग ड्राइव्ह
या ड्राइव्ह अंतर्गत एकूण 98 मुख्य रस्ते, 187 उद्याने आणि संपूर्ण मुठा-मुळा नदी काठ अशा एकूण 286 ठिकाणी घेतला जाईल आणि अंदाजे 268 किमी अंतराचा हा प्लॉगिंग ड्राइव्ह होईल. यानंतर भिडे पूल याठिकाणी सर्व सभासद, सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी या सर्व सहभागी नागरिक, संस्था यांनी एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे.