सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडियाचे महासंचालक डॉ. राय यांची माहिती
पुणे – सॉफ्टवेअर उत्पादनांचा जागतिक बाजार 500 बिलियन डॉलर्सचा असून, त्यातील भारताचा वाटा जवळपास 8 बिलियन डॉलर्सचा आहे. येत्या 2025 पर्यंत तो 70 ते 80 बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी सरकार, विविध मंत्रालये तसेच व्यवसायातील तज्ज्ञांकडून एकत्र येऊन पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती “इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालया’च्या “एसटीपीआय’ (सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया) विभागाचे महासंचालक डॉ. ओंकार राय यांनी सोमवारी दिली.
“सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे’ (“सीप’) तर्फे आयोजित आठव्या “पुणे कनेक्ट’ या परिषदेचे उद्घाटन राय यांच्या हस्ते झाले. यावेळी “सीप’च्या कार्यकारी समितीचे सदस्य तसेच पुणे कनेक्टचे प्रमुख अभिजित अत्रे, सीपचे अध्यक्ष अश्विन मेघा, उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे, पुणे कनेक्टचे कार्यक्रम संचालक स्वप्नील देशपांडे उपस्थित होते.
या वेळी तंत्रज्ञानातील सल्लागार जसप्रीत बिंद्रा यांच्या “द टेक व्हिस्परर’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. “फ्यूचर इन द कनेक्टेड वर्ल्ड’ ही या वर्षीच्या पुणे कनेक्टची मध्यवर्ती संकल्पना होती. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कस् ऑफ इंडिया अंतर्गत देशात 28 “सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारली जात असून, त्याद्वारे माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा मेंटॉर म्हणून एक समूह तयार केला जात आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.