राष्ट्रीय हॉकी खेळाडू महेश रसाळ यांचा आरोप
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि विक्रम पिल्ले ऍकॅडमी यांच्यामध्ये जून 2019 मध्ये करार करण्यात आला होता. या करारानुसार विक्रम पिल्ले ऍकॅडमीला नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम (पॉलीग्रास) हे महापालिकेने पिंपरी-चिंचवड हद्दीतील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिले होते. तसेच स्टेडियमचे इतर व्यवस्थापनाचे असे एकूण दरमहा 2 लाख रुपये ऍकॅडमीला अदा करत आहे. यानंतरही पिल्ले ऍकडमीने विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रीय हॉकी खेळाडू महेश रसाळ यांनी केला आहे.
याबाबत रसाळ यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, महापालिकेसोबत झालेल्या कराराच्या अ पत्रातील अटी व शर्ती धाब्यावर बसवून या ऍकॅडमीने पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. तसेच ठरवून दिलेल्या दिलेल्या वेळे व्यतरिक्त इतर वेळेत ज्या खासगी शाळा, विद्यार्थी आणि ऍकॅडमींचे बुकींग येते विक्रम पिल्ले ऍकॅडमीने त्यांना अधिकार नसताना देखील त्यांच्याकडून दर महा 500 रुपये आकारुन महापालिकेचे हजारो रुपये लाटून फसवणूक केली.
विक्रम पिल्ले ऍकॅडमीसोबत महापालिकेने करार करुन 1 वर्ष उलटून गेले आहे. मात्र प्रशिक्षकांनी खेळाडुंना उत्तम प्रशिक्षण देऊन त्यांचा संघ देखील तयार केलेला नाही. तसेच एकही संघ जिल्हा, राज्य किंवा देश पातळीवर खेळण्यास पाठवलेला नाही. तसेच कुठलीही राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेली नाही.