रांजणगाव गणपती -शिरूर तालुक्यात वाढता करोना संसर्ग ही बाब चिंताजनक आहे. तालुक्यात करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या आणखी उपाययोजना तातडीने करा. तालुक्यात चार ते पाच ठिकाणी कोविड रुग्णांसाठी 500 बेडचे कोविड सेंटर तातडीने उभारण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या आहेत.
रांजणगाव एमआयडीसी येथे करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन व उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार ऍड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, रवींद्र काळे, राजेंद्र गावडे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, निरीक्षक सुरेशकुमार राऊत उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, शिरूर तालुक्यातील खासगी रुग्णालये करोना रुग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घ्यावीत. पोलीस यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेऊन नियम न पाळणाऱ्यावर कडक कारवाई करावी. जिल्हा परिषद गटामध्ये समन्वयक म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने डॉक्टर व परिचारिका यांची औषधे, उपकरणे आणि रुग्णांसाठी नाष्टा व जेवण सुविधांसह कोविड सेंटर तातडीने तयार करुन त्यामध्ये 50 ऑक्सिजन बेड तयार करा. खासगी डॉक्टर व खासगी रुग्णालयांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसी, मलठण, शिरूर, न्हावरे, मांडवगण फराटा व शिक्रापुर येथे सर्व सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर तातडीने सुरू करा. तसेच आवश्यक ती खासगी रुग्णालये तातडीने ताब्यात घेण्यात येणार आहेत.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी