बारामती -राज्यात दूधदरात झालेली घसरण व अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी महायुती शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहून न्याय देण्याची भूमिका घेईल. तत्कालीन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दुधाला देशात एक नंबरचा दर देण्याचे ऐतिहासिक काम केले आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरम्यान, महाराष्ट्रात तहसील, जिल्हाधिकारी यांना सोमवार (दि.20) निवेदन देणार आहे. तसेच दि. 1 ऑगस्ट रोजी महायुती राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असणारे रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दागडे-पाटील यांनी दिली.
राज्यव्यापी दूध आंदोलनाच्या अनुषंगाने महायुतीची लाईव्ह बैठक पार पडली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये महायुतीच्या काळात शेतकऱ्याला प्रतिलीटर 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करीत किमान प्रतिलीटर 27 रुपये दूध दर देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय तत्कालीन दुग्धविकास मंत्री जानकर यांनी घेतला. अडचणीतील शेतकऱ्यांना आधार दिला आहे. आत्ताच्या काळात शेतकरी मोठा अडचणीत आला आहे. दूध दरासाठी रासप रस्त्यावर उतरली असून त्यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्ष एकत्रित येणार आहेत.
यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, माजी समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर, भाजप किसान मोर्चा अध्यक्ष, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलनाची भूमिका मांडली.
यावेळी बैठकीला रासपचे आमदार रत्नाकर घुट्टे, रासपचे महासचिव तथा शेळी-मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील, संघटनमंत्री माऊली सलगर, रणजित सूळ, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.