पिंपरी -करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका वॉर्ड स्तरावर मायक्रो नियोजन करण्यात आल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली. महापालिका वॉर्ड स्तरावर संस्थात्मक विलगीकरण कक्ष, करोना टेस्टींग सेंटर, फिव्हर क्लिनिक, क्षेत्रीय स्तरावर सुसज्ज वॉर रुम उभारण्यात येणार आहेत, याबाबत प्रशासकीय स्तरावर आदेश देखील निर्गमित करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती देताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये व मोठया निवासी सोसायटयांचे क्लब हाउस, इतर हॉलमध्ये वॉर्ड कोविड सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या 32 वॉर्डमध्ये स्वतंत्रपणे प्रत्येकी 01 याप्रमाणे 32 वॉर्ड कोविड सेंटर स्थापन होतील. वॉर्ड कोविड सेंटरमध्ये किमान 50 बेडची व्यवस्था राहील.
या जागेजवळ स्वतंत्रपणे फिवर ओपीडी स्थापन करुन संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आरटीपीसीआर तपासणी केली जाईल. शहरातील सर्व मोठ्या निवासी सोसायट्यांमध्ये अंदाजे 100 घरे किंवा 500 लोकसंख्येपेक्षा जास्त त्यांच्या मालकीच्या क्लबहाऊस मध्ये विलगीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी कार्यवाही करतील.
कोविड बाधित रुग्णांना गृह विलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये उदा. गरोदर माता, दिव्यांग व्यक्ती, बेडरिडन व्यक्ती, लहान मुलांची देखभाल करणारा दुसरे कोणी नसणारा एकमेव पालक इत्यादी यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल.
सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी कोविड संशयित रुग्णांची व कोविड बाधित रुग्णाची माहिती महापालिकेला देणे बंधनकारक राहील. “मी जबाबदार’ ऍप मध्ये रुग्णांची नोंद करणे बंधनकारक राहील. यासाठी लॉग-इन आयडी महापालिकेकडून देण्यात येईल.
अवास्तव बिलांवर नियंत्रण
यापूर्वी खासगी रुग्णालयांकडून करोना रुग्णांना अवास्तव बिले आकारणी करणे अथवा बिलासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने अशा बिलांचे पडताळणी समिती मार्फत पूर्व लेखा परीक्षण करून शासन नियमाप्रमाणे बिलांची आकारणी केली असल्याची खात्री करूनच अंतिम बिल निश्चित केले जातील. यामुळे अवाजवी बिल आकारणीवर नियंत्रण येईल आणि त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे, असेही महापौर माई ढोरे यांनी सांगितले.