पुणे -करोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने पीएफ गुंतवणूदारांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कर्मचारी दुसऱ्यांदादेखील त्याच्या पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम (कोविड ऍडव्हान्स) काढू शकणार आहे.
करोना काळामध्ये आर्थिक गरजा भागविण्यासाठी, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत या ऍडव्हान रकमेची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे श्रम-रोजगार मंत्रालयाने पीएफच्या नियमांत सुधारणा केली आहे.
त्यामुळे आता तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याऐवढी रक्कम किंवा पीएफ खात्यामध्ये असलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम ऍडव्हान्स म्हणून काढता येऊ शकेल, अशी माहिती भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे (पुणे विभाग) आयुक्त (वन) अरुणकुमार यांनी कळविली आहे.
त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते त्यांच्या आधार नंबरशी लिंक करणे तसेच त्यांचे केवायसी भरून घेणे आता कंपनी मालकांस बंधनकारक राहणार आहे. दि. 1 जूनपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. या संबंधीच्या सूचना आणि माहिती “आयडब्लूयू डॉट ईपीएफओ इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाइटवर दिली आहे.
कर्मचारी देखील त्यांच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) ची माहिती अपलोड करू शकतात. जर कंपनी मालकांनी ईलेक्ट्रॉनिक कम रिटर्न (ईसीआर) हे चलन भरले नाही, तर पीएफ संबंधीची प्रक्रियाच होणार नाही.