पिंपरीत महायुतीच्या उमेदवाराचा सर्वाधिक खर्च

विधानसभा निवडणूक : खिलारे यांचा खर्च अवघा साडेसात हजार

पिंपरी – पिंपरी विधानसभा निवडणुकीत 18 उमेदवारांपैकी 15 उमेदवारांनी तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक खर्च सादर केला आहे. तीन उमेदवारांनी हा खर्च सादर केला नसल्याने त्यांना खर्च सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

शिवसेना-भाजपचे युतीचे उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार 19 तारखेअखेर 11 लाख 35 हजार 231 इतका सर्वाधिक खर्च दाखविला आहे. तर त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी 6 लाख 73 हजार 499 इतका खर्च सादर केला आहे. तर निवडणूक खर्चात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण गायकवाड हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 6 लाख 50 हजार 263 एवढा खर्च नोंदविला आहे, तर सर्वात कमी खर्च अपक्ष उमेदवार मीनाताई खिलारे यांनी केला आहे. त्यांनी केवळ 7 हजार 554 रुपये इतका खर्च सादर केला आहे. निवडणूक खर्च सादर करण्यासाठी 11 तारखेला पहिला टप्पा होता. त्यामध्ये 15 उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला. त्या वेळी निवडणूक खर्च सादर न केल्याबद्दल तिघांना नोटीस बजावली होती.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 तारखेला दोन उमेदवारांनी खर्च सादर केला नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तर आता तिसऱ्या टप्प्यात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार धनराज गायकवाड, अपक्ष उमेदवार अजय गायकवाड, राजेश नागोसे यांनी खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे त्यांना खर्च सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

एक लाखापेक्षा जास्त खर्च करणारे उमेदवार
गौतम चाबुकस्वार (शिवसेना) : 11 लाख 35 हजार 231
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) : 6 लाख 73 हजार 499
प्रवीण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) : 6 लाख 50 हजार 263
बाळासाहेब ओव्हाळ (अपक्ष) : 5 लाख 27 हजार 350
दीपक ताटे (अपक्ष) : 3 लाख 7 हजार 875
संदीप कांबळे (भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी) : 1 लाख 29 हजार 858

Leave A Reply

Your email address will not be published.