हितेश मुलचंदानी खून प्रकरणी फरार अरबाज शेख पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी – हितेश मुलचंदानी खून प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. खंडणी दरोडा विरोधी पथकाने दापोडी येथून अरबाज मुन्ना शेख (वय 20, रा. खडकी बाजार पुणे) याला अटक केली आहे. त्यामुळे आता या खून प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची संख्या पाच झाली असून त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत. तर आणखी शहाबाज कुरेशी हा फरार आहे.

पोलिसांनी यापूर्वीच अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय 25, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय 20, रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव), व दोघा अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील आरोपी अरबाज शेख दापोडी येथील आत्तार वीट भट्टी जवळ थांबला असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अरबाज शेख याला ताब्यात घेतले. त्याला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

उल्लेखनीय आहे की, पिंपरी येथे हॉटेल कुणालमध्ये हॉटेल व्यावसायिक आणि आरोपी यांच्यात झालेल्या वादात व्यावसायिकाचा मित्र हितेश मुलचंदानी (वय 23, रा. पिंपरी) यांचे अपहरण करुन निघृण खून करण्यात आला होता. या खुनामुळे नागरिकांमध्ये आणि व्यापारी वर्गात प्रचंड रोष होता. व्यापाऱ्यांनी बंद, मोर्चे, कॅंडल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्‍त केला होता. यामुळे आरोपींना लवकरात-लवकर गजाआड करणे पोलिसांसाठी अत्यावश्‍यक झाले होते. एका आठवड्याच्या आत पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले आहे. त्यापैकी दोन जण अल्पवयीन आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.