वाढत्या तापमानाचे  पिंपरी-चिंचवडकरांना चटके

तापमान 42 अंशांवर ः सलग चौथ्या दिवशी पाऱ्याने ओलांडली चाळिशी

पिंपरी – शुक्रवारचा दिवस पिंपरी-चिंचवडकरांना खूपच चटके देणारा ठरला. सलग चौथ्या दिवशी पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने नागरिकांची लाही-लाही होत होती. पुणे वेधशाळेने शुक्रवारी सकाळी नोंदवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारचे कमाल तापमान 42 अंश सेल्सियस इतके होते, तर किमान तापमान 23.4 इतके होते. दुसरीकडे खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने नोंदवेलेल्या तापमानाच्या नोंदीनुसार शुक्रवारी दुपारच्या वेळी पारा 42 अंशांच्याही पुढे गेला होता. स्कायमेट वेदरने मागील आठवड्यातच उष्णतेची लाट पुन्हा येण्याचे भाकित वर्तवले होते. ते भाकित सध्या बसत असलेल्या चटक्‍यांमुळे खरे ठरताना दिसत आहे. सलग चौथ्या दिवशी पाऱ्याने चाळिशी गाठली असल्याने आणि त्यात अधून-मधून येणारे ढग उकाडा असह्य पातळीवर नेऊन ठेवत आहेत.

दुसरीकडे “स्कायमेट’ नुसार पिंपरी-चिंचवड शहराच्या किमान तापमानातही घट होताना दिसत नाही. किमान तापमान 28 अंश सेल्सियस असल्याचे ही खासगी हवामान संस्था सांगत आहे. तसेच सायंकाळी सहापर्यंत तापमान 40 अंशांपर्यत राहत असल्याचे आणि रात्री 12 नंतर 30 अंशाच्या खाली उतरत असल्याचे या संस्थेचे संकेतस्थळ सांगत आहे. याचाच अर्थ की संपूर्ण 24 तास हे कमी जास्त प्रमाणात उकाड्याचे आहेत. तापमान वाढत असतानाच आद्रताही खूप कमी झाली आहे. शुक्रवारी कमाल तापमानामध्ये वाढ होऊन पारा 41 अंशाच्या पुढे सरकल्याने उन्हाचा कडाका चांगलाच जाणवला.

वाढलेल्या उन्हामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून, दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली होती.
सलग चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे सरकला आहे. त्यामुळे, वातावरणातील उष्णता वाढल्याने पिंपरी-चिंचवडकरांना उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच वातावरणात बदल झाला होता. मागच्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहराचे वातावरण काहीसे थंड होते. मात्र, अवकाळी पाऊस झाल्यानंतर उष्णतेची लाट परतली आहे. दिवसभर प्रखर ऊन पडू लागले आहे. त्यामुळे, उन्हाची तीव्रताही भासू लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.