पिंपरी – शहरातील सायबर गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, तांत्रिक साहित्याची उपलब्धता करून सायबर गुन्हेगारीला आळा घातला जाईल, असा विश्वास शहराचे नवीन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी व्यक्त केला.
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून चौबे यांनी पदभार घेतला. भारतीय पोलीस सेवेतील 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी (दि. 13) बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्त येथे बदली झाली. तर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांची पिंपरी चिंचवड येथे आयुक्तपदी बदली झाली.
आयुक्त पदाची सूत्रे घेतल्यानंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शहराच्या प्राथमिकता जाणून घेणं आवश्यक आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य आहे. गुन्हेगारीवर विशेषतः सायबर गुन्हेगारीवर लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सायबरमध्ये काम करायचे आहे, त्यांना प्रशिक्षण देऊन सायबर गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी अत्याधुनिक संसाधने उपलब्ध करावी लागणार आहेत. सायबर गुन्ह्यांचे स्वरूप पाहून पोलीस स्टेशन अथवा सायबर विभागाकडून तपास करण्याबाबत नियोजन केले जाईल, असे आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगितले. गुन्हेगारी कमी असल्यास होते उद्योगांची भराभराट आर्थिक गुन्हेही वाढत आहेत. त्याकडेही लक्ष असेलच. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हे नवीन आहे. आयुक्तालयासाठीचे आवश्यक अनेक प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. शहराची प्रगती गुन्हेगारीवर अवलंबून असते. गुन्हेगारी कमी असणाऱ्या शहरात उद्योगधंदे येतात. शहराची भरभराट होते. त्यामुळे शहर गुन्हेगारीमुक्त करण्यावर भर असेल असेही ते म्हणाले.