पिंपरी – शहरातील तीन लाख मिळकत धारकांनी साडेआठ महिन्यांत 501 कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या विविध सवलत योजना आणि जप्तीच्या मोहीमेमुळे “रेकॉर्ड ब्रेक” अशी वसुली झाली आहे. तसेच उर्वरित मालमत्ता धारकांनी मिळकत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 88 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांतील साडेआठ महिन्यांत 3 लाख 1 हजार 434 मालमत्ता धारकांनी 501 कोटी 40 लाख रूपये कराचा भरणा केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचे कर आकारणी व कर संकलन विभागाने 1000 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरातील थकबाकीदारांना विभागाने नोटीस बजावून जप्तीची मोहीम तीव्र केली आहे. तसेच तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. अशा थकबाकीदारांवर सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच आतापर्यंत पाचशे कोटींचा टप्पा पार करण्यात या विभागाला यश आले आहे.
सहाय्यक आयुक्त देशमुख म्हणाले, महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. शहरातील तीन लाख निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल 583 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करूनही मालमत्ताधारक कर भरत नसल्याने महापालिकेने कठोर भूमिका घेत जप्तीची मोहीम राबवली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सदनिका, व्यावसायिक गाळे जप्त केले आहेत. त्यामुळे थकीत कर वसूल करण्यास चांगले यश येत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी थकबाकी आणि चालू वर्षाचा कर भरून महापालिकेला सहकार्य करून शहर विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्याकडे या विभागाचा पदभार आल्यापासून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत मालमत्ता धारकांना विविध कर सवलती दिल्या. त्याचबरोबर सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळेच कर भरलेल्या तीन लाख मिळकत धारकांपैकी तब्बल दोन लाख 302 मिळकत धारकांनी 272 कोटी 91 लाख 97 हजार रुपयांचा ऑनलाइन कराचा भरणा केला आहे.
आर्थिक वर्षांतील साडेआठ महिन्यांत 501 कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. मात्र, अद्यापही मोठे लक्ष गाठणे बाकी आहे. करदात्या नागरिकांनी हे लक्ष गाठण्यासाठी कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे. महापालिका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे, लोकाभिमुख करणे आणि हे करत असतानाच उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरवणे हे आमचे लक्ष्य आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक