पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांमार्फत दोन दिवसांपूर्वीच झालेल्या मोठ्या बदल्यांनंतर पुन्हा एकदा निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या या आश्चर्यकारक आहेत. बदल्यांच्या या यादीत आठ पोलीस निरीक्षकांची नावे आहेत. परंतु एका अधिकारीची बदली न करता त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार सांभाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आणि विभागाला शिस्त लावण्यात येणार याचे स्पष्ट संकेत मिळत होते. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच आयुक्तांनी अनेकदा केले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे पडसाद बदल्यांच्या स्वरुपात दिसून येतात. तसेच काहीसे पुन्हा एकदा दिसले असले तरी देखील काही पोलीस ठाण्यांमध्ये महत्त्वाची पदे रिक्त ठेवल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पोलीस निरीक्षकाचे नाव – सध्याची नेमणूक – नवीन नियुक्ती
बालाजी सोनटक्के – गुन्हे शाखा युनिट – अंमली विरोधी पथक
विठ्ठल कुबडे – सामाजिक सुरक्षा विभाग – सामाजिक सुरक्षा विभाग व जनसंपर्क अधिकारी
भास्कर जाधव – दरोडा विरोधी पथक – व.पो.नि. तळेगाव दाभाडे
अमरनाथ वाघमोडे – व.पो.नि. तळेगाव दाभाडे – गुन्हे शाखा, युनिट – 1
मनिष कल्याणकर – व.पो.नि. देहूरोड – विशेष शाखा -1
पांडुरंग गोफणे – देहूरोड पो. ठाणे (गुन्हे) – वाहतूक व नियोजन विभाग
विलास सोंडे – निगडी पो. ठाणे (गुन्हे) – व.पो.नि. देहूरोड
श्रीराम पौळ – अंमली पदार्थ विरोधी पथक – दरोडा विरोधी पथक
दोन दिवसांत पुन्हा बदली
दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या बदल्यांच्या यादीतही बालाजी सोनटक्के, विलास सोंडे आणि भास्कर जाधव यांचे नाव होते. दोनच दिवसांत पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. सोनटक्के यांना गुन्हे शाखा युनिट एकमधून काढून अंमली पदार्थ विरोधी पथकात पाठविण्यात आले आहे. तर जाधव यांच्याकडे तळेगाव पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच सोंडे यांच्याकडे निगडी पोलीस निरीक्षक (गुन्हे) पदाची जबाबदारी देण्यात आली होती. दोनच दिवसांत त्यांना देहूरोड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी पाठविण्यात आले आहे.