पिंपरी-नवी सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने अस्थिरोग विभागात प्लॅस्टर करण्यासाठी आलेल्या रुग्णांना तासन्तास वाट बघण्याची वेळ आली आहे. त्या बाबत संबंधीत डॉक्टरांवर कारवाई करण्याची गरज असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र, प्लॅस्टर करण्यास होत असलेल्या दिरंबाईबद्दल सफाई कामगाराला नोटीस बजाविली आहे. या अजब नोटीशीमुळे जिल्हा शल्यचिकित्सकांचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. रुग्णालयात कर्मचारी व डॉक्टर वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी वारंवार रुग्ण व नातेवाईक करत आहेत. त्याकडे रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करत आहेत. नुकतेच अस्थिरोग विभागात प्लॅस्टर करण्यासाठी रुग्णांची रांग लागली होती. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक व्हीलचेअरवर बसून वाट पाहत होते. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर अथवा कर्मचारी कोणीही उपस्थित नव्हते. विभागाला टाळे लावण्यात आले होते. सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत ओपीडीची वेळ असतानाही कोणीच नसल्याने काही नातेवाईकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर काही तासांनी डॉक्टरांना विभागात पाठवून पुढील कार्यवाही करायला लावली.
रुग्णांनी केलेल्या तक्रारीवरून संबंधीत विभागाच्या डॉक्टरांवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने सफाईगारांना नोटीस बजावली आहे. कामाच्या वेळी अनुपस्थित का होतात, त्या बाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गैरवर्तणूक केल्याबाबत विनावेतन रजेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हा शल्यचिकित्सकांनी नोटीशीद्वारे दिला आहे. मात्र संबंधीत विभागाचे प्रमुख, त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांना अभय दिले असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याने या कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जमादाराची चुकीची माहिती
आजारी असल्याने कामावर येणार नसल्याची तोंडी माहिती संबंधीत सफाईगाराकडून रुग्णालयाच्या जमादाराला दिली होती. त्याबाबत लेखी देण्याची सुचना जमादाराकडून करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी संबंधीत सफाईगाराला कोणतीच सूचना केली नाही. उलट रुग्णालय प्रशासनाला या बाबत काही कळविले नसल्याची बाब समोर आली. जमादाराच्या चुकीच्या माहितीमुळे संबंधीत सफाईगाराला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
प्लॅस्टर विभागात सफाईगाराची नेमणूक कशासाठी?
जिल्हा रुग्णालयातील प्लॅस्टर विभागात अनुपस्थित राहिल्याने रुग्णांची गैरसोय झाली असा आरोप करत रुग्णालय प्रशासनाने सफाईगारांना नोटीस बजावली. मात्र सफाईगारांची या विभागात नेमणूक का केली, त्यांना प्लॅस्टरचे काम करण्यासाठी सांगितले जाते का, असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत. अनेकदा सफाईगारच प्लॅस्टर करत असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत. त्या बाबत चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.