पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून या फेरीद्वारे 3 हजार 337 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे. या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदविण्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
अकरावी प्रवेशासाठी 326 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 16 हजार 510 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासाठी 1 लाख 1 हजार 208 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये मिळून एकूण 72 हजार 280 विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षात महाविद्यालयात प्रवेश निश्चित झालेले आहेत. कॅप अंतर्गत 64 हजार 193 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून 35 हजार 710 जागा अद्यापही रिक्तच पडलेल्या आहेत. कोट्याअंतर्गत 8 हजार 87 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून 8 हजार 520 जागा आजूनही रिक्तच राहिलेल्या आहेत. एकूण 44 हजार 230 प्रवेशाच्या जागा रिक्तच आहेत.
तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीद्वारे कला शाखेसाठी 303, वाणिज्य शाखेसाठी 1 हजार 399, विज्ञान शाखेसाठी 1 हजार 518 याप्रमाणे प्रवेश जाहीर झालेले आहेत. या फेरीसाठी 36 हजार 446 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यासाठी 4 हजार 185 विद्यार्थ्यांकडून अर्ज प्रक्रिया करण्यात आलेली होती. प्रवर्गनिहाय प्रवेश जाहीर झालेले आहेत. यात जनरल-2378, एससी-605, एसटी-13, व्हिजेए- 431, एनटीबी-58, एनटीसी-43, एनटीडी-10, ओबीसी-146, एसबीसी-23, ईडब्लुएस-20 याप्रमाणे समावेश आहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार 2 हजार 350 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय जाहीर झालेले आहे. दुसऱ्या पसंतीक्रमानुसार 480, तिसऱ्या क्रमानुसार184, चौथ्या क्रमानुसार 126, पाचव्या क्रमानुसार 126 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे.
नामांकित महाविद्यालयांचा शाखानिहाय कट ऑफ
डॉ. कलमाडी श्यामराव महाविद्यालय- कला (252), वाणिज्य (358), विज्ञान (415). मॉडर्न महाविद्यालय – कला (403), वाणिज्य (386), विज्ञान (316). आबासाहेब गरवारे महाविद्यालय – कला (312), विज्ञान (393). सिम्बायोसिस महाविद्यालय – कला (446), वाणिज्य (385). फर्गसन महाविद्यालय – विज्ञान (462). नेस वाडिया महाविद्यालय – वाणिज्य (338). सर परशुरामभाऊ महाविद्यालय – वाणिज्य (370), विज्ञान (366). एस.एम.जोशी महाविद्यालय – वाणिज्य(322), विज्ञान (292).