पिंपरी – नागरिकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळही सज्ज झाले असून, वल्लभनगर आगारातून राज्याच्या विविध मार्गांवर 77 बसचे नियोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात नोकरी, व्यावसायानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि परराज्यांतून अनेकजण येथे स्थायिक झालेले आहेत. त्यांना सण-उत्सव आपल्या गावी जाऊन साजरे करायचे असतात. त्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने नियोजन केले जाते. दिवाळीनिमित्त मिळालेल्या सुट्यांमध्ये शहरात येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत, एसटी प्रशासनाने पुण्यातील आगारांमधून 515 अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात वल्लभगर आगारातून 77 बसचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे शहरातून आपल्या गावी जाणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच एसटी प्रवाशांना तिकीट खिडकीसह ऑनलाइन तिकीट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली असून या गाड्यांचे आरक्षण होण्यास सुरुवात झाली आहे. आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या प्रवाशांकरिता या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट भागातून दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पिंपरी-चिंचवड येथील एसटीची आगारे प्रवाशांच्या आणि गाड्यांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होतात. त्यामुळे दरवर्षी एसटी प्रशासन खडकी, कॅन्टोन्मेंट भागातील मोठी मैदाने भाड्याने घेऊन येथून अधिकच्या काही गाड्यांचे नियोजन करते. यंदाही असेच नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव आगार असल्याने अनेक जण खडकी, शिवाजीनगर येथूनही बुकिंग करतात. त्यामुळे प्रशासनाने नियोजन केले आहे.