पारनेर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, आ. नीलेश लंके यांनीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना, तसेच तहसीलदारांना पत्र देत या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलने, उपोषणे होत आहेत. अंतरवली सराटी गावामध्ये गेले काही दिवस मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते. सरकारने त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून त्यांना आश्वासन दिले होते.
परंतु सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे आंतरवली सराटी येथे जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्याच बरोबर राज्यातील अनेक ठिकाणी असंख्य मराठा बांधव आंदोलन, उपोषण, साखळी उपोषणास बसले आहेत.
तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे असंख्य मराठा बांधव पारनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. मराठा समाजाची मागणी रास्त असूनस या मागणीस पाठींबा असल्याचे आ. लंके यांनी म्हटले आहे.