हिंजवडी – मुळशी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या व समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ आक्रमक झाला आहे. संघाच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.
मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शहाजी मारणे यांच्या नेतृत्वाखाली मुळशीचे गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ हिंगणे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. सर्व शिक्षक गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यास कटिबद्ध आहेत. पण शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी ठाम व आग्रही भूमिका शिक्षक संघाने प्रशासनासमोर मांडली आहे.
शिक्षकांच्या अर्जित रजांची मंजुरी, सेवा पुस्तके अद्ययावत करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव, एनपीएसचे प्रस्ताव, सर्व प्रकारची बिले मंजूर करणे, शालेय पोषण आहार, मानधन लवकरात लवकर जमा करणे, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रम आदी कामे वेळेत होण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षकांना देण्यात आलेल्या एमएससीआटी कोर्सचा निधी शासनाने भरावा. शिक्षकांच्या पगारातून याची कपात करू नये, आशा अनेक मागण्या शिष्टमंडळाने मांडल्या. अर्जित रजांची नोंद, सेवा पुस्तके अद्ययावत करणे आदी कामे आठवडाभरात पूर्ण करणार असल्याचे हिंगणे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. संतोष गावडे यांनी आभार मानले. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी शिवाजी चवले, अविनाश टेमगिरे, रियाज शेख, रवींद्र चौधरी, संजय मारणे, सलीम तांबोळी व जालिंदर चौधरी, शुभांगी बोराळे आदी उपस्थित होते.
प्रथम कर्तव्य व नंतर न्याय हक्क हे ब्रीद वाक्य घेऊन मुळशीतील प्राथमिक शिक्षकांची संघटना काम करत आहे. तालुक्यात 90 टक्के शिक्षक संघाचे सभासद आहेत. गेली दहा वर्षे वेतनश्रेणी, पेन्शनयोजना व शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघ सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहे.
– शहाजी मारणे, अध्यक्ष, मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघ.