जाधववाडी – पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु येथील नागरिक आणि व्यावसायिक तसेच वाहनचालक नियमांना हारताळ फासत असल्याने शहर स्मार्ट कसे होणार असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात सर्रास अवैध अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परंतु वाहतूक विभाग कारवाई करत नसल्याने वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत एमआयडीसी तसेच इतर लघु उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच भंगार व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी तसेच मोशीच्या काही भागात आणि काळेवाडी आदी परिसरात भंगार व्यावसायिक आहेत. येथे कंपन्यांमधून खरेदी केलेले भंगार, तसेच इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश भागामध्ये अवैध वाहतूक करण्यात येत आहे. परंतु आरटीओ आणि वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरातील कोणत्याही भागात गेले तरी अवैध वाहतूक होताना दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
काही भागात अवैध वाहतुकीमुळे वाहनचालकांना अपघात घडले आहेत. तर काहींचे जीव गेले आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. कुदळवाडी परिसरात तर बहुतांश व्यावसायिकांनी व्यवसायासाठी शेड उभारले आहेत. परंतु अवजड वाहने सहज प्रवेश करू शकतील असे रस्ते न ठेवल्याने चिखली पिंपरी मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका
कुदळवाडी, जाधववाडी, मोशी, चिखली आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होते. या भागातच पिंपरी चिंचवडसाठी आरटीओ कार्यालय आहे. परंतु वाहतूक विभाग व आरटीओ अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे.
विद्युत वाहिन्यांना धोका
कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगार व्यावसायिक आहेत. ते अवैध वाहतूक करतात. क्षमतेपेक्षा जास्तीचे साहित्य भरून वाहतूक करतात. त्यामुळे या भागातील विद्युत तारांना वाहने अडकून तारा तुटत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.