नेवासा – नेवासेनगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटेच्या सुमारास वडार समाजाच्या वतीने गंगेवरून आणलेल्या कावड यात्रेचे नेवासा नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. “बोल मोहिनीराज भगवान की जय’, असा जयघोष करत गंगाजलाने मोहिनीराजांच्या उत्सव मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.
प्रवरासंगम येथून पायी आलेल्या कावड यात्रेचे नेवासा शहरात पहाटेच्या सुमारास आगमन झाल्यानंतर चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. यात्रेमध्ये शेकडो युवक सहभागी झाले होते. प्रवरानदीच्या तिरी स्थापित असलेल्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी यात्रा गेली. तेथे असलेल्या उत्सवमूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालण्यात आला.
यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. पहाटेच्या सुमारास श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात स्थापित झालेल्या उत्सवमूर्तीची वेदमंत्राच्या जयघोषात विधिवत पूजन निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व कृषी अधिकारी अंजली बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर उत्सव मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी पाकशाळेत गर्दी केली होती.