पिंपरी – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवाचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान, हा मोर्चा बुधवारी (दि. २४) पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री उशिराने दाखल झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी सहा ते गुरूवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत तब्बल २४ तास पोलिसांना बंदोबस्त करावा लागला. सकाळी सहापासून तैनात करण्यात आलेले पोलीस तब्बल २४ तास रस्त्यावर उभे होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी राज्यभरातील मराठा बांधव एकवटले आहेत. जालना येथील अंतरवाली सराटी येथून निघालेल्या मोर्चात अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. दरम्यान, बुधवारी मोर्चेकरी रात्री ९.४० वाजता सांगवीमार्गे पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाले.
औंधमार्गे शहरात दाखल झालेल्या मोर्चात शहरातील मराठा बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. डांगे चौक, चिंचवड परिसर भगव्या रंगाने न्हाऊन निघाला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा बांधव रस्त्यावर उतरल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी साध्या वेशातील पोलिसही तैनात होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील काही रस्ते बॅरिकेड्स लावून वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते.
गुन्हे शाखाही रस्त्यावर
गुरूवारी सकाळी साडेसहा वाजता मोर्चेकरी आयुक्तालय हद्दीच्या बाहेर पडले. त्यामुळे पोलिसांना तब्बल २४ तासांच्या पुढे खडा पहारा द्यावा लागला. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. साध्या वेशात फिरून गर्दीवर लक्ष ठेवण्याचा टास्क गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आला होता.
आयुक्तांकडून पाहणी
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मोर्चा जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली. पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. तसेच, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशीदेखील बंदोबस्तावर ‘वॉच’ ठेवून होते.
फिरते शौचालय नसल्याने अडचण
शहरात मोर्चा येणार असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने ठिकठिकाणी फिरती शौचालये ठेवणे अपेक्षित होते. मात्र ती नसल्याने नागरिकांच हाल झाले. बंदोबस्तासाठी देण्यात आलेले नियुक्तीचे ठिकाण सोडून जाता येत नसल्याने विशेषतः महिला पोलिसांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली होती.
मराठा समाजाने काढलेल्या मोर्चादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी सकाळी सहापासूनच पोलिसांना ठरवून दिलेल्या पॉईंटवर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेचे पोलिसही रस्त्यावर उतरवण्यात आले होते.
– सतीश माने, सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी- चिंचवड
असा होता बंदोबस्त
उपायुक्त – ५
सहायक आयुक्त – ८
पोलीस निरीक्षक – ३७
उपनिरीक्षक / सहायक निरीक्षक – ११२
अंमलदार – ९७०
वॉर्डन – १२१