पिंपरी – मतदार यादीच्या पुर्ननिरीक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. हा उपक्रम 21 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. या कालावधीत संबंधित भागातील बीएलओ हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशीलाची पडताळणी करणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत 475 बीएलओमार्फत ही कामे केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील बीएलओ प्रामुख्याने मतदार यादीची फेरतपासणी करणार आहेत. गत विधानसभा निवडणुकीत पिंपरीचे 3 लाख 57 हजार 207, चिंचवडचे 5 लाख 66 हजार 732 आणि भोसरी विधानसभेत 5 लाख 13 हजार 761 मतदार नोंद होते. यामध्ये नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार, 1 जानेवारी 2024 रोजीच्या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे तसेच 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑगस्ट 2023 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदार, दुबार नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, यादीत दुरुस्ती अशा मुद्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करीत आहेत.
असा असेल कार्यक्रम
मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण व मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदी कामे 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहेत. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 व अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.