उपनगर – पिंपरी चिंचवड महापालिका करदात्या नागरिकांना पावसाचा फटका बसू नये, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिल, मे महिन्यापासून शहरात नालेसफाई, ड्रेनेजलाइन सफाई, रस्त्यांची डागडुजी, धोकादायक झाडे छाटणे आदी कामे करत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये सर्वसामान्यांनी भरलेल्या करातून खर्च केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात पाऊस पडल्यानंतर अधिकारी आणि ठेकेदार तुपाशी आणि करदाता नागरिक सोयीसुविधांपासून उपाशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका साधारण पाच महिन्यांपासून शहरात पाणी तुंबू नये यासाठी स्ट्रॉर्मवॉटर लाइन दुरुस्ती, साफसफाई, ड्रेनेजलाइन दुरुस्ती, रस्त्यांची डागडुजी आदी कामे क्षेत्रीय कार्यालयानुसार करून घेत आहे. हे सर्व कामे पूर्ण झाल्याचा अक्षरशः महापालिका आयुक्तांनी दावा केला. परंतु शहरात थोडा पाऊस झाला तरी महापालिकेने किती लक्षपूर्वक आणि दर्जेदार कामे केले आहेत याची प्रचिती शहरातील रस्त्यांवरून फिरताना आज शनिवार (दि. 2) पहाटे झालेल्या पावसामुळे पुन्हा उद्योगनगरीतील नागरिकांना आली. शहरातील बहुतांश रस्त्यांवरील पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले होते. तर काही ठिकाणी झाडे पडले. त्यामुळे महापालिकेचा कारभारवर नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
स्पाइन रोड पाण्याखाली
चिखली – मागील अनेक वर्षांपासून स्पाइन रोडला ठराविक ठिकाणी पावसाळ्यात पाणी भरते. याबाबत दरवर्षी वृत्तपत्रामधून बातम्या प्रसिद्ध होतात. परंतु महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असून तात्पुरत्या स्वरुपात पाण्याचा निचरा कसा होईल यासंबंधी उपाययोजना करते. त्यामुळे मागील पाच महिन्यांपूर्वी झालेल्या पावसात जी अवस्था स्पाइन रोडची झाली तीच आजच्या पावसामुळे झाली. येथील पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नाशिक आणि मुंबई महामार्गाला जोडणारा स्पाइन रोड शहरातील महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पवार वस्ती आणि शरदनगर भागात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहते. परंतु महापालिकेच्या वतीने येथे कोणतीच उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे पाऊस झाला की रस्ता तुडुंब भरून वाहतो. अक्षरशः आज सकाळी पवार वस्ती येथील पुलाखाली साचलेल्या पाण्यात एक दुचाकी बंद पडली. त्यामुळे दरवर्षी कर भरून महापालिकेची तिजोरी भरणाऱ्या सर्वससामान्य नागरिकांना नाकर्ते अधिकाऱ्यांमुळे त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
स्पाइन रोड हा चिखली, मोशी, भोसरी, एमआयडीसी, शाहूनगर, पूर्णानगर, मोरेवस्ती, निगडी, रुपीनगर, तळवडे आदी परिसरात जाणाऱ्या नागरिकांसाठी व कामगारांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांसह लहान मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु पावसाचे पाणी निचरा होत नसल्याने साचून राहत आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. दुचाकी चालकांच्या अंगावर मोठी वाहने जवळून जाताना पाणी उडून येते. त्यामुळे नागरिक प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका करताना दिसून येत होते.