सातारा – वाहनधारकांनी मोटर वाहन कायद्याचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या राज्यस्तरीय आढावा दरम्यान अपघात व त्यावरती करावयाच्या उपायोजनांबाबत मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. गतवर्षीच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. या बैठकीत अपघात व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत सूचना व निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार एप्रिल ते ऑगस्ट 2023 दरम्यान रस्ता सुरक्षा दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेत परिवहन नियमाचा भंग करणाऱ्या एक हजार 790 खाजगी बसेसवर कारवाई करून 83 लाख 38 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एप्रिल ते ऑगस्ट 2023 दरम्यान खाजगी बस तपासणी मोहिमेमध्ये पाच हजार 535 बसेसची तपासणी करून मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 1790 दोषी बसेसवर कारवाई करत 83.38 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
ऑटो रिक्षा तपासणी मोहिमेत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 97 रिक्षांवर कारवाई करत दोषी ऑटो रिक्षा वाहनचालकांकडून 35 हजार रुपये दंड वसूल झाला. स्कूल बस तपासणीमध्ये मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 99 स्कूल बसेसवर कारवाई करुन, दोषी स्कूल बस वाहन चालकांकडून एक लाख 80 हजार रुपये दंड वसूल झाला. दुचाकी स्वारांच्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एप्रिल ते ऑगस्ट 2023 दरम्यान विना हेल्मेट वाहन वापरणाऱ्या एकूण 9518 वाहनधारकांवर कारवाई झाली. ऑगस्ट 2023 मध्ये एनएचएआय पथक, आनेवाडी पथक, खंडाळा पथक या पथकांकडून राष्ट्रीय महामार्गावर मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 1488 दोषी वाहनांवर कारवाई झाली. तसेच एप्रिल ते ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये एकूण 9350 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली.
एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविलेल्या हेल्मेट तपासणी मोहिमेत 12 हजार 36 वाहनांची तपासणी करुन 9518 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन लाख 63 हजारांचा दंड वसूल झाला. सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान अंमलबजावणी पथकाकडून वाहन तपासणी करताना एकूण 18,404 दोषी वाहनांवर कारवाई झाली आणि 331.29 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे विशेष तपासणी मोहीम सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत यापुढेही नियमितपणे राबवली जाणार असून सर्व वाहनधारकांनी रस्ता सुरक्षा दृष्टीने मोटर वाहन नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.
“सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या सूक्ष्म नियोजन, अंमलबजावणी व प्रबोधनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या कमी झालेली आहे. सन 2022 च्या तुलनेत सन 2023 मध्ये अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण 5.47 टक्क्यांनी कमी झाले तर अपघातांची संख्या 4.52 टक्क्यांनी कमी झाली आहे.’
विनोद चव्हाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.