शहरात 149 रुग्णांची भर : 280 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज नवीन 149 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 9 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 93088 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजतापर्यंत शहरातील 149 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णांची नोंद झाली नाही. आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 7 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 2336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1656 तर शहराबाहेरील 680 रुग्णांचा समावेश आहे.
आज शहरातील पिंपरी, भोसरी, चिखली, निगडी येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील आंबेगाव, आळंदी येथील 2 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 280 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 89511 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3237 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
तीन ज्येष्ठांनी केली करोनावर मात
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात तीन ज्येष्ठांनी शुक्रवारी (दि. 4) करोनावर मात केली. ते करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दोन महिला आणि एक पुरुष रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. 60 ते 89 वयोगटातील हे रुग्ण आहेत.
औंध येथील 89 वर्षीय महिलेला 23 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तर, मांजरी बुद्रुक आणि दिवे (ता. पुरंदर) येथील 1 महिला आणि 1 ज्येष्ठ पुरुष रुग्णाला 24 नोव्हेंबरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व ज्येष्ठांनी करोनाला हरविले. ते आज बरे होऊन घरी परतले. नेरे आणि औंध येथील दोघांच्या करोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. रुग्णालयात सध्या 23 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.