पिंपरी – शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेकडून आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वेक्षण देखील सुरू आहे. महापालिकेकडून डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून संबंधितांवर कारवाई केली जात आहे. परंतु महापालिकेचे स्वत:चेच प्रकल्प डासोत्पत्तीचे कारण ठरत आहेत. यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मोशी बोऱ्हाडेवाडी येथे सुरू असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळच पाण्याचे डबके तयार झाले आहे. त्या ठिकाणी डासोत्पत्ती होण्याची शक्यता असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. त्यामुळे जबाबदार कोणाला धरणार? दंड कोणाला आकारणार, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज कंटेनर सर्व्हे केला जात आहे. डेंग्यू, चिकनगुनिया आदीसारख्या आजारांना थांबविण्यासाठी डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट केली जातात. त्यानुसार घरातील फ्रीज, पाण्याची भांडे, टाकी, पंक्चरची दुकाने, बांधकामाच्या ठिकाणी तपासणी केली जात आहे. या ठिकाणी डासांच्या निर्मितीला कारण ठरल्यास संबंधित मालकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र स्वतःच्या चुकांकडे कानाडोळा करत असल्याची वस्तुस्थिती आहे.
मोशी, बोऱ्हाडेवाडी येथे पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू आहे. काम झाल्यानंतर अनावश्यक सांडपाणी तिथल्या डबक्यात सोडले जात आहे. हे पाणी साचून दुर्गंधी येत आहे. तसेच डासांची निर्मिती होत आहे. वाडी येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्तीची भिती निर्माण झाली आहे.