आर्थिक दुर्बल कुटुंबांना पिंपरी-चिंचवड पालिका देणार तीन हजार रुपये

पिंपरी – लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून तीन हजार रुपयांची तातडीची मदत सत्ताधारी भाजपने जाहीर केली आहे. याबाबतची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी गुरुवारी (दि. 15) पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी महापौर माई ढोरे. स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, नगरसेवक तुषार कामठे उपस्थित होते.

शहरातील रिक्षाचालक, फेरीवाले, घरेलु कामगार, चर्मकार, कामगार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक, जिम ट्रेनर अशा आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व परवानाधारक व्यक्तींना ही मदत दिली जाणार आहे. कोविड संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तोंडाला पाने पुसणारे तुटपुंजे पॅकेज जाहीर केले. मात्र, अशा घटकाला दिलासा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत गुरुवारी (दि.15) आयत्यावेळी ठराव हा मंजूर करण्यात आला. त्यानुसार शहरातील रिक्षाचालक (बॅचधारक), परवानाधारक फेरीवाले, नोंदणीकृत घरेलू कामगार, चर्मकार (गटई कामगार), नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक, जिम ट्रेनर आदी आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये. म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

शहरामध्ये अनेक हातावर पोट असलेले नागरिक आहेत. त्यांना 3 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यामध्ये अशी स्वतंत्र मदत करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. नियमानुसार मदत केली जाणार असून त्याची तातडीने अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्तासोबत चर्चा करणार आहोत. सुमारे 50 हजार पात्र लाभार्थ्यांना ही मदत करण्यात येणार आहे.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.