करोनाचा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी ‘घातक’; जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर 24 तासात मातेचा मृत्यू

पिंपरी चिंचवड – राज्यात करोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. नवीन बाधितांची संख्या वाढत असल्याने मृत्यूदरही वाढला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. अशातच पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मातेचा काही तासातच करोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

36 वर्षी महिलेला 4 एप्रिलला प्रसुतीचा त्रास जाणवत असल्याने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेची तपासणी केली असता शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालवल्याचे लक्षात आले. तात्काळ त्या महिलेची करोना चाचणी केली असता पाॅझिटिव्ह अहवाल आला.

दुसऱ्या दिवशी महिलेवर सीझर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. तिने दोन जुळ्या गोंडस बाळांना जन्म दिली. मात्र, त्या बाळांना आईची माया एक दिवसही मिळाली नाही. प्रसुतीनंतर प्रकृती अधिकच ढासळत गेली. त्यातच महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन्ही बाळांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी घातक

महापालिकेच्या रुग्णालयात 20 करोनाबाधित गरोदर महिलांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी पाच महिला आयसीयुमध्ये आहेत. त्यामुळे करोनाचा हा नवा स्ट्रेन गरोदर महिलांसाठी घातक ठरत असल्याचे वायसीएमचे डाॅक्टर पाटील यांनी सांगितले. तसेच घरी असणाऱ्या महिलांनीही योग्य ती काळजी घ्यावी. डाॅक्टरांच्या संपर्कात रहावे. करोनाची तातडीने चाचणी करून घ्यावी, असेही डाॅक्टरांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.