पिंपरी – मोशीतील टोल नाक्याची मुदत संपल्यानंतर बंद झालेला टोल नाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून सुरू आहेत. नवीन वर्षापासून हा टोल नाका सुरू करण्याबाबत अधिसूचना काढून देखभाल खर्चासाठी 40 टक्के दराने टोल वसूल करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. परंतु स्थानिक नागरिकांनी या टोल वसुलीला विरोध दर्शविला आहे.
स्थानिक नागरिकांना मासिक 315 रुपये पास दर देखील जाहीर केला गेला. या विरोधात मोशीसह डुडूळगाव, चिंबळी, मोई, कुरूळी, चिखली या गावांतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. त्यामुळे रविवारी (दि. 8) मोशीतील ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह श्री नागेश्वर महाराज मंदिरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ग्रामस्थांसह नागरिक व महिलांनी टोल विरोधात आक्रमकपणे भावना व्यक्त केल्या. पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण 2005 मध्ये होऊन मोशी व चांडोली येथे टोल नाके उभारून टोल वसुली सुरू केली. 2021 मध्ये संपूर्ण खर्च वसूल झाल्याने या रस्त्याची टोल वसुली शासनाकडून बंद करण्यात आली. असे असताना अचानकपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून पुन्हा या दोन्ही ठिकाणी टोल नाके सुरू करण्यात येणार, अशी बातमी वाचून ग्रामस्थ आक्रमक झाले.
नाशिक फाटा ते चाकण दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रुंदीकरणाच्या नावाखाली नाशिक फाटा ते मोशी येथील रस्त्याच्या कडेची बांधकामे पाडून 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊन गेला तरी कुठेही काम सुरू नाही. मग अनेकांचा रोजगार का हिरावून घेतला गेला असा सवाल यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आला. सेवा रस्ता नाही, रुंदीकरण करण्याबाबत काहीही हालचाल नाही, महामार्गाची दुर्दशा, पादचाऱ्यांसह महिलावर्ग, विद्यार्थ्यांवर रस्त्यावर चालताना अपघाताचे भय, जीवघेणे अपघात, बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याबाबत काहीच निर्णय नाही, अशा परिस्थितीत टोल का सुरू करताय असे अनेक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आले.
या वेळी ग्रामस्थांकडून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्थानिक खासदार, आमदार यांना निवेदन देऊन 8 दिवसांत यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थ या विरोधात व्यापक जन आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. या वेळी मोशीसह चिखली, चिंबळी, डुडूळगाव, मोई येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी माजी नगरसेवक वसंत बोराटे, युवा नेते निखिल बोऱ्हाडे, युवा नेते नीलेश बोराटे, प्रा. राजेश सस्ते, युवा नेते गणेश सस्ते, चंद्रकांत तापकीर, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, वंदना जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. या बैठकीस उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल श्री नागेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नितीन सस्ते यांनी आभार मानले.