- राष्ट्रवादी कॉंग्रेसची अखेरच्या क्षणी माघार
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार नगरसेविका निकिता कदम यांनी शुक्रवारी (दि. ६) अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदाची निवडणूक आज झाली. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार पीठासन अधिकारी होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे सांगून खेमणार यांनी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला.
भाजप उमेदवार घोळवे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी कदम यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना माघार घेण्याबाबत विनंती केली. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीस चार मिनिटे बाकी असताना कदम यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेत असल्याबाबतचा अर्ज पीठासन अधिकाऱ्याकडे सादर केला.