तीन रुग्णांचा मृत्यू : एकूण बाधित 2262
पिंपरी – गुरुवारी देखील करोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज करोनाचे शंभरहून अधिक रुग्ण आढळत आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार गेल्या 24 तासात शहरातील 128 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 6 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. तसेच गेल्या दहा दिवसांपासून रोज करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. गुरुवारी देखील करोनाने तीन बळी घेतले. त्यापैकी दोन शहरातील व एक शहराबाहेरील रुग्ण आहे.
गुरुवारी शहरातील 74 पुरुष आणि 54 महिलांना करोनाची लागण झाली. यामुळे शहरातील करोनाबाधितांचा आकडा 2262 झाला आहे. तर मृत्यूची एकूण संख्या 65 वर पोहोचली आहे. शहरातील 39 व शहराबाहेरील 26 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
जून महिन्यात शहरात खूप मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज शंभरहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या दहा दिवसांपासून रोज करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहेत.
उपचारानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येत असल्याने बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गुरुवारी 74 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आजपर्यंत एकूण 1326 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये वाढत असलेल्या रुग्णांमुळे रोज करोनाबाधितांचा उच्चांक होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सध्या शहरातील 896 आणि शहराबाहेरील 67 करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.