पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आकुर्डी रुग्णालयाअंतर्गत कुदळवाडी परिसरात गोवर आजाराचे 7 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्या पैकी 5 संशयित रुग्णांचे रक्त तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. या रुग्णांची रक्त तपासणी व घशातील द्रवाची तपासणी मुंबई येथील हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामुळे कुदळवाडी येथे गोवर आजाराचा उद्रेक घोषित करण्यात आला असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
शहरात आजाराचा उद्रेक लक्षात घेता गोवर आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या रहिवास क्षेत्रात महापालिकेमार्फत सर्व्हेक्षण सुरू केले आहे. 9 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील गोवर सदृश्य आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या बालकांचे सर्व्हेक्षण, त्यांचे गोवर प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेतला जात आहे. घेऊन गोवर लसीकरणाचे डोस पूर्ण करणे तसेच बालकांना जीवनसत्व अ डोस देणे आदी बाबींचा सर्व्हे केला जात आहे. लहान मुलांना होणाऱ्या गोवर या आजाराने गेल्या काही दिवसांपासून मुुंबईत भीषण रुप धारण केले आहे. यामुळे पिंपरी-चिचंवड महापालिका विशेष काळजी घेत आहे.
गोवर सदृश लक्षणे असलेली बालके आढळल्यास त्यांनी त्वरित नजीकच्या मनपा दवाखाना, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना कळवावे. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन घरातील बालकास गोवर सदृश लक्षणे आहेत, काय याबाबत सर्व्हेक्षण करत आहेत. गोवर लसीकरण करून घ्यावे. पिंपरी चिंचवड मनपामार्फत आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून वैद्यकीय विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
– डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.
गोवरची लस द्या
लहान बालकांना गोवर आजार होऊ नये यासाठी 9 महिने ते 16 महिन्यांच्या बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. पाच वर्षांपर्यंत मुलांना ही लस देता येते. दर गुरुवारी तसेच मनपा दवाखाना रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन या कालावधीत ही लस मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
ही घ्या काळजी
गोवर सदृश लक्षणे आढळून आलेल्या बालकांना जीवनसत्व अ चे दोन डोस 24 च्या अंतराने देणे. कुटुंबियांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे. मुलांना गोवरची लक्षणे असल्यास शाळेत आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. गोवरची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालय दाखविणे.
गोवर सर्वेक्षण अहवाल
सर्वेक्षण केलेले घरे ः 78 हजार 398
सर्वेक्षण केलेली लोकसंख्या ः 2 लाख 93 हजार 931
पाच वर्षाखालील सर्वेक्षण केलेल्या बालकांची संख्या ः 16 हजार 470
गोवरची लक्षणे
गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो.
अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे चट्टे ही या आजाराची प्रमुख लक्षणे मानली जातात.
सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणे दिसतात. तसेच डोळे लाल होतात.
बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो.