पिंपरी -गेल्या काही दिवसांपासून वाहन निर्मिती क्षेत्राशी निगडीत असलेल्या मध्यम आणि लघु उद्योगांमध्ये उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये वाहन विक्रीत घट होत असल्याने बड्या वाहन निर्मात्या कंपन्या आपले उत्पादन कमी करतात पर्यायाने मध्यम आणि लघु उद्योगांचे काम देखील कमी होते. यामुळे उद्योजकांना सध्या नव्या वर्षाची प्रतीक्षा आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात हजारो असे मध्यम आणि लघु उद्योजक आहेत जे बड्या ऑटोमोबाइल कंपन्यांना लहान सुटे भाग पुरवितात. देशभरातील वाहन विक्रीतील चढ-उताराचा थेट परिणाम या उद्योगांच्या उत्पादनावर होत असतो. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाहन विक्रीत घट होत असल्याने उत्पादनावर देखील परिणाम होतो. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे निर्यात देखील कमी झाल्याचे स्थानिक उद्योजक सांगत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने स्टील निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयांनंतर देखील स्टीलचे दर कम झाले आहेत. यामुळे मागणी कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
भारतीय बाजारात सर्वाधिक चारचाकी वाहन विक्री करणाऱ्या कंपनीने पुढील पाच वर्षांत 30 टक्के उतादन कमी करण्याची घोषणा केली आहे. याचाही परिणाम मध्यम आणि लघु उद्योगांवर होण्याची शक्यता आहे. परंतु नव-नवीन कार भारतीय बाजारात येत असल्याने ही कमी भरुन निघेल, अशी अपेक्षा स्थानिक उद्योजक व्यक्त करत आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये का घटते उत्पादन ?
गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दसरा, दिवाळी या मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होते. परंतु नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मात्र विक्री मोठ्या प्रमाणावर मंदावते. याचे मुख्य कारण म्हणजे वर्ष संपण्यास अवघे एक ते दोन महिने राहिलेले असतात आणि वाहनाचे मॉडल हे त्याच वर्षाचे असते. जेव्हा वाहनाची विक्री करायची असते त्यावेळी एक-दोन महिन्यांमुळे मॉडल एक वर्ष जुने भासते. अनेकजण दर तीन ते चार वर्षांनी वाहन बदलतात. असे ग्राहक मॉडलचा महिना आणि वर्ष याकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या वर्षाचे मॉडल घेण्याऐवजी नवीन वर्षांत वाहन घेण्याचा कल अधिक आहे.
वर्ष संपण्यास एक-दोन महिने राहिले असल्याने एवढ्या कमी कालावधीसाठी या वर्षाचे वाहन शक्यतो नागरिक घेत नाहीत. विकताना मॉडल ईयरमुळे रिसेल व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता वाटत असल्याने नागरिक वाहन घेत नाहीत. यामुळे कंपन्या देखील उत्पादन कमी करतात. याचा परिणाम सध्या वाहनांचे सुटे भाग बनविणाऱ्या मध्यम आणि लघु उद्योगांवर पडतो. सध्या निर्यातही कमी झाली असून स्टीलचे दरही उतरले आहेत. यावरुन सध्या अगदी थोडा मंदीचा काळ जाणवत आहे. परंतु नवीन वर्षांत उद्योग पुन्हा पूर्वपदावर असतील.
– प्रेमचंद मित्तल, संस्थापक, संचालक, वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज