हिंजवडी – अनेक वर्षांपासून रखडलेला भूमकरवस्तीच्या पेरूच्या बागेजवळील रस्ता अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक कोंडीच्या त्रासातून एकदाचा निःश्वास सोडला आहे.
याठिकाणी वारंवार होणारे अपघात आणि दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे आयटीयन्ससह स्थानिक नागरिक अक्षरशः वैतागले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी दूर करण्यास महापालिका प्रशासनाला यश आल्याने अखेर पेरूच्या बागेजवळचा तो स्पॉट वाहतुकीस खुला झाला आहे. दरम्यान, भूमकर चौक ते कस्तुरी चौक रस्ता दोन्ही बाजूने दुहेरी आणि प्रशस्त असल्याने, याठिकाणी वाहतूक विना अडथळा मार्गस्थ होत असे. मात्र, भूमकर वस्तीच्या पश्चिमेकडे पेरूच्या बागेजवळील एक लेन अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे बंद असल्याने त्याठिकाणी रस्ता अरुंद झाला होता. अशा परिस्थितीत या ठिकाणाहून जाताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत होती.
भूमकर वस्ती जवळील रस्ता दुहेरी सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांसह आयटीयन्स समाधान व्यक्त करत आहेत. दरम्यान, हिंजवडी आयटी पार्क तसेच पिरंगुट, उरवडे, घोटावडे एमआयडीसीसह लवासा व पौड तहसील कार्यालय तसेच ताम्हिणीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच, पिंपरी चिंचवड शहर आणि उपनगरातून दररोज लाखो नागरिक याच रस्त्याने विविध कारणास्तव आयटी परिसरात येत असतात. सर्व रस्ते दुहेरी आणि प्रशस्त झाल्याने वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा मार्गस्थ होण्यास मदत होत आहे.
कस्तुरी चौकाच्या पुढे सदर ठिकाणी एक मार्ग बंद असल्याने वाहतूक कोंडी होत होती. तसेच, मध्येच रस्ता अरुंद असल्याने अपघातही होत होते. त्यामुळे अखेर चक्राकार एकेरी वाहतूक सुरू करावी लागली. मात्र सदर रस्त्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. याठिकाणी रस्ता दुहेरी सुरू झाल्याने वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे.
– सुनील पिंजण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग वाकड.