पिंपरी (संदीप घिसे) – भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत तब्बल 156 जागांवर विजय मिळविला. सातव्यांदा गुजरात विधानसभा राखल्याने पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या आनंदोत्सवात शहरातील भाजपाच्या दोन गटांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. जॅकवेल निविदेमध्ये भोसरी आणि चिंचवडचा गट आमनेसामने आलेला असतानाच आज चिंचवडकरांनी नवी सांगवीत तर भोसरीकरांनी मोरवाडी येथे गुजरातच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे आनंदाच्या उत्सवावरूनच भाजपमध्ये तसेच शहराच्या राजकीय पटलावर या गटबाजीची चर्चा चांगलीच रंगली होती.
नवी सांगवीत जल्लोष
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवीतील कृष्णा चौकात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नागरिकांना पेढे वाटून निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा केला.
भाजपने गुजरातमध्ये सलग सातव्यांदा विजय प्राप्त केला आहे. राज्याचा कारभार 27 वर्षे भाजपच्या हातात होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला एँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, निकालात भाजपने गुजरातमध्ये राजकीय इतिहास घडवला आहे. गुजरात विधानसभेच्या 182 पैकी तब्बल 156 जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनीही आनंदोत्सव साजरा केला.
या आनंदोत्सवात भाजपचे प्रभाग अध्यक्ष सखाराम रेडेकर, माजी नगरसेवक सागर अंघोळकर, बाळासाहेब देवकर, नवनाथ देवकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, गणेश बनकर, सुनील कोकाटे, प्रवीण पाटील, राजेंद्र येडे, सचिन सोनवणे, चेतन तारू, साई कोंढरे, उमेश झरेकर, शुभम फरांदे, अमित घोडसाळ, आदित्य मस्के, मनीष रेडेकर, अरुण गळदगे, भालचंद्र तरटे, अशोक बनकर, नरसिंह पाटील, शामराव पताडे, एम. पी. चौगुले, जे. डी. पाटील, गणेश जुनवणे, प्रवीण जगताप, मदन तांदळे, राजेश शिंत्रे, प्रेमानंद रेडेकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोरवाडीत आनंदोत्सव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विक्रमी विजय मिळवला. सलग सातव्यांदा मतदारांनी भाजपाला संधी दिली. याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मोरवाडी-पिंपरी येथील भाजपाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाबाहेर शहर भाजपाचे पदाधिकारी यांनी पेढे वाटले. तसेच, ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. यावेळी सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, संदीप कस्पटे, विशाल वाळुंजकर, विनोद तापकीर, किरण पाटील, राजेंद्र ढवळे, वैशाली खाडे, हनुमंत लांडगे, सुधीर चव्हाण, गणेश ढाकणे, दीपक नागरगोजे, हेमंत देवकुळे, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, गणेश नखाते, रवी दाभोळे, किशोर गव्हाणे, मुकेश चुडासमा, कोमल शिंदे, कमलेश भरवाल, कैलास सानप,सुरेश गादीया, दिनकर शिंपी, नितीन अमृतकर, दत्ता यादव, कृष्णा नवले, संजय परळीकर आदी उपस्थित होते.
लोकोपयोगी कारभाराचा विजय
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत दिले. भारताला स्वयंपूर्ण करण्याचा, जगातील सर्वोत्तम देश करण्याचा भाजपाचा संकल्प आहे. जनकल्याण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. याच निर्धारातून गुजरात सरकार आणि पक्ष संघटनेने केलेल्या अविरत कार्यामुळेच हा मोठा विजय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.