पिंपरी – मी महापालिकेत काम करतो. तुमच्या घराचा कर थकला आहे, असे सांगून पादचारी वृद्धाची सोन्याची अंगठी आणि मोबाइल घेऊन अनोळखी व्यक्ती पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता पवारवस्ती, चिखली येथे घडली.
अविनाश मनोहर पवार (वय 75, रा. निगडी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पवारवस्ती चिखली येथून पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला. दुचाकीवरील व्यक्तीने तो महापालिकेत काम करतो. पवार यांच्या घराचा कर थकला आहे. तो भरला नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशी बतावणी करून पवार यांना कर भरण्यास सांगितले. त्यापोटी आरोपीने पवार यांच्याकडून विश्वासाने 25 हजारांची सोन्याची वेढणी आणि 500 रुपयांचा मोबाइल फोन घेतला आणि आरोपी फसवणूक करून पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.