डिसेंबरपर्यंत मेट्रो सरू करण्याचे लक्ष्य ः येत्या चार महिन्यांत तयार होणार लोहमार्ग
तीन हजार मेट्रिक टनाचे रुळ
या मार्गासाठी सुमारे तीन हजार मेट्रिक टन वजनाचे रूळ लागणार आहे. प्रथम नागपूर मेट्रो प्रकल्पाचे 600 मेट्रिक टन रूळ आणण्यात येतील. त्यानंतर उर्वरित 2 हजार 400 मेट्रिक टन रूळ स्वित्झर्लंडच्या इस्ट मेटल ए.जी. कंपनीकडून आणले जाणार आहेत. रूळ बसविण्याचे काम अपूर्वा कृती इन्फ्रा लिमिटेड कंपनी करणार आहे. ही कंपनी चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुल ते रेंजहिल्स डेपोपर्यंतच्या 12.50 किलोमीटर अंतराचा रिच वनचे काम करणार आहे. त्यामध्ये रेंजहिल्स डेपोचाही समावेश आहे. या कामाची मुदत 18 महिने आहे. याबाबत मेट्रो मार्गिका एकचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले की, प्रायोरिटी मार्ग डिसेंबरपर्यंत पूण करून, या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याने, त्या दृष्टीने महामेट्रोचे काम वेगात सुरू आहे.
पिंपरी – “पुणे मेट्रो’चे सर्वाधिक वेगाने काम हे पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असून या शहरात मेट्रोने खांब उभारुन, त्यावर स्पॅन टाकून आता रुळ अंथरण्यास देखील सुरुवात केली आहे. पुणे मेट्रोचा पहिला रुळ शुक्रवारी पिंपरीतील खराळवाडी येथे रुळच्या कामास सुरूवात झाली आहे. प्रायोरिटी मार्गावरील पिंपरी ते दापोडी या सुमारे 7 किलोमीटर अंतरावर रुळ टाकण्याचे काम ऑक्टोबर 2019पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
नागपूर मेट्रोचे शिल्लक राहिलेले रूळ शहरात दाखल झाले असून, ते शुक्रवारी (दि.14) खराळवाडीत उतविण्यात आले. त्याचे पूजन महामेट्रोचे रिच वनचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे व अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नागपूर मेट्रोचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर 3.5 किलोमीटर अंतराचा व्हायाडक्ट बांधून तयार झाला आहे. खराळवाडीपासून कासारवाडीच्या दिशेने आणि फुगेवाडीपासून कासारवाडीच्या दिशेने अशा दोन स्वतंत्र टीमद्वारे एकाच वेळी रूळ बसविण्याचे काम केले जाणार आहे. खराळवाडी ते कासारवाडी दरम्यान दोन किलोमीटरपर्यंतच मार्ग रुळ टाकण्यासाठी तयार झाला आहे, तर फुगेवाडीपासून कासारवाडी दरम्यान सुमारे दीड किलोमीटरचा मार्गही रुळ टाकण्यासाठी तयार आहे. हे 18 ते 25 मीटर लांबीचे रूळ बसविण्यात येणार आहेत.
“पुणे मेट्रो’चा प्रायोरिटी मार्ग हा पिंपरी-चिंचवड शहरातच असून या मार्गावर डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे लक्ष्य महामेट्रोने निश्चित केले आहे. यासाठी मार्गिकेवर रूळासाठी कॉंक्रिटचे पट्टे तयार करून त्यावर रूळ बसविले जाणार आहेत. अत्याधुनिक “प्लॅश बट’ व “अल्युमिना थर्मिट’ या वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. दरमहा दोन्ही बाजूने दोन किलोमीटर अंतराचा रूळ तयार केला जाणार आहे. दोन्ही बाजूला समांतर असलेले दोन मार्ग मिळून चार किलोमीटर अंतराचा टप्पा दर महिन्यास पूर्ण होणार आहे. रुळ बसविण्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.