पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार तब्बल 9 हजार नवीन जागांची निर्मिती केली आहे. सध्या महापालिकेच्या 7 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला 720 कोटींचा खर्च होत आहे. नवीन जागा भरल्यानंतर हा खर्च दुपटीने वाढण्याची चिन्हे आहेत. सरकारने पालिकेच्या सुधारित आकृतीबंधास अद्याप मंजुरी दिलेली नाही. मात्र, गत आर्थिक वर्षांत पालिकेला एक हजार 879 कोटी 83 लाखांचा महसूल मिळाला होता. सुधारित आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर वेतनावर मोठा खर्च होणार आहे. त्यामुळे शहर विकासाला मोठी खीळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहर दिवसेंदिवस वाढत असून 30 लाखांच्या जवळ लोकसंख्या पोहचली आहे. त्यामुळे महापालिकेला नागरिकांना मुलभूत सेवा व सुविधा पुरविताना ताण येत आहे. मनुष्यबळ संख्या वाढविण्यासाठी नवीन आकृतीबंध तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे.
राज्य शासनाच्या नियमानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर म्हणजे आस्थापना खर्च एकूण उत्पन्नाच्या 25 टक्क्यांच्या आतच करण्याची अट आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील 1 हजार 578 जागा भरण्यासाठी राज्य शासनाने ती अट शिथिल केली आहे. दुसरीकडे 302 पदांच्या तब्बल 9 हजार जागा भरल्यानंतर वेतनाचा खर्च पुढे खर्च जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तो मोठा आर्थिक भार महापालिकेस सहन करावा लागणार आहे. त्यामुळे विकास कामांवर खर्च करण्यास पालिकेला मर्यादा येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पालिकेने वैद्यकीय विभागातील स्टॉफ नर्स व इतर पदाच्या 131 जागांची नोकरीभरती केली आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील 388 नोकरभरतीमधील 11 पदांचा निकाल जाहीर केला असून 4 पदांचा निकाल जाहीर करणे बाकी आहे. यामुळे 519 जागांची भरती पूर्ण होणार आहे.
मनुष्यबळ वाढल्याने कारभार गतिमान होणार
नागरिकांना सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेस मनुष्यबळाची आवश्यकता आहे. प्रत्येक महिन्याला सुमारे 30 ते 40 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. अनेक वर्षे नोकरभरती न झाल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता भासत आहे. पालिकेस 9 हजार जागांची गरज आहे. या सर्व जागा भरल्यानंतर सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सुरळीत व गतीमान पद्धतीने सेवा व सुविधा पुरविणे सुलभ होईल. पालिकेच्या कामकाजाची गती वाढणार आहे.
7 हजार 53 अधिकारी, कर्मचारी कार्यरत
महापालिकेमध्ये सध्या मंजूर जागा 11 हजार 513 आहेत. यापैकी सध्यस्थितीत 7 हजार 53 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनासाठी दरमहा 60 कोटी तर वर्षाला 720 कोटी खर्च आहे. हे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सुधारीत आकृतीबंध पालिकेने तयार केला. तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सुधारीत आकृतीबंधात तब्बल 5 हजार 325 विविध विभागांच्या नव्या जागांची निर्मिती करण्यात आली आहे. एकूण 16 हजार 838 जागा आहे. साधारण 9 हजार जागांची भरती पालिकेला करावी लागणार आहे. मात्र, आकृतीबंधाला अद्याप शासनाने मान्यता दिलेली नाही.
महापालिकेचा सुधारित आकृतीबंध तयार करून, तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. शासनाने 1 हजार 578 अत्यावश्यक सेवेतील पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आहे. ती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. आस्थापना खर्च 25 टक्क्यांपर्यंत ठेवण्याची अट शासनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शिथिल केली आहे. अत्यावश्यक सेवेतील पदांची भरती केल्यानंतर 27.50 टक्के अस्थापना खर्च होऊ शकतो.
विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार जागांची संख्या
वर्ग प्रस्तावित
वर्ग-1 476
वर्ग-2 557
वर्ग-3 8,041
वर्ग-4 7,764
एकूण 16,838