पुणे – पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे शहर सुन्न पडले आहे. रात्री उशिरा पब व बारमधून मद्यधूंद अवस्थेत तरुणाई बाहेर पडते आणि बेधुंदपणे वाहने चालवल्यामुळे असे प्रकार घडतात असे उघडकीस आले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारे सर्व अनधिकृत पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावेत, अशी मागणी पुण्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त व पुणे महानगर पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
पत्रात काय म्हंटले आहे ?
“काहीच दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणाकडून बेदरकार पद्धतीने वाहन चालवित अपघात केल्यामुळे पुणेकर सुन्न झाले आहेत. याला पुणे शहर व जिल्ह्यातील बेकायदा पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणारे पब, बार व हुक्का पार्लर कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील तरुणाई मोठ्या संख्येने याला बळी पडत असून मद्यधुंद अवस्थेत पब व बार मधून बाहेर पडतांना अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. पुणे शहर व जिल्ह्याचे समाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी व पुणे शहराचे नावलौकिक शिक्षण, संशोधन व सांस्कृतिक राजधानी हाच असावा, याकरिता शहरातील तरुणाईला व्यसनाधीनतेच्या विळख्यात टाकणाऱ्या या पब व हुक्का पार्लर संस्कृतीला तातडीने पायबंद घालणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे शहरात भान हरवून वावरणाऱ्या दिशाहीन तरुण पिढीला शिस्त लागावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
दोन जणांनी गमावला जीव –
दरम्यान, 8 दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कारने रात्री एका दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दुचाकीवरील तरुण आणि तरुणी जागीच मृत्यू पावले. पोर्शे कार चालवणारा अल्पवयीन मुलगा होता. तो पबमध्ये दारू पिऊन बाहेर पडला होता. या घटनेनंतर पुण्यातील पब संस्कृती चर्चेत आली आहे. त्यानंतर आता ही पब संस्कृती कायमची बंद व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.