पिंपरी (अँकर स्टोरी ) -पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत देहू-आळंदी ही राज्यातील महत्वाची तीर्थक्षेत्र असल्याने, महापालिकेच्या वतीने या दोन्ही मार्गांवर अध्यात्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही तीर्थक्षेत्रांकडे जात असताना महापालिका हद्दीतून वारकऱ्यांचे मार्गक्रमण होत असल्याने या दोन्ही मार्गांवर महपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी वारकरी व अध्यात्मिक शिल्प उभारण्यात आली आहेत. तर चऱ्होली येथे वीणधारक वारकऱ्याचे 20 फूट उंचीचे भव्य शिल्प उभारण्याचे काम वेगात सुरू आहे.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज हे वैष्णवांचे दैवत आहे. ही दोन्ही तिर्थक्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत आहेत. त्यामुळे या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास हा महापालिकेच्या हद्दीतून होत असतो. दरम्यान, महापालिका हद्दीतील देहू आणि आळंदी या दोन्ही तिर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आले आहे. दिघी येथील विठ्ठल चौकात टाळ-मृदुंग पेटीचे शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेते. याशिवाय मॅगझिन चौकात दिंडीकऱ्यांचे शिल्प चा चौकाची शोभा वाढवत आहे; तर मोशीतील वारकऱ्याचे शिल्प शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पंढरीच्या मार्गक्रमनातील पहिला नैवद्य असलेल्या धाकट्या पादुका मंदिरालगत संत नामदेव- संतज्ञानेश्वर भेट समूह शिल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. आता महापालिकेच्या वतीने वीणाधारक वारकऱ्याचे 20 फुटी शिल्प उभारून पालखी महामार्गाच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.
देहू-आळंदी या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभते, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. त्यामुळे आषाढी, कार्तिकी वारीदरम्यान शक्य तेवढ्या मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावर आमचा भर असतो. देहू-आळंदी रस्त्यावर वारकरी विसावा थांबेदेखील महापालिकेने उभारले आहेत.
– नितीन काळजे, माजी महापौर
देहू-आळंदी जवळ आल्याची वर्दी
देहू व आळंदी या दोन्ही तिर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास विनाअडथळा व्हावा, याकरिता महापालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांचे रूंदीकरण केले आहे. तसेच या दोन्ही तीर्थक्षेत्रांपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आध्यात्मिक, वारकऱ्यांच्या शिल्पांमधून देहू-आळंदी ही तीर्थक्षेत्र जवळ आल्याची वर्दी मिळते. त्यामुळे ही शिल्पे वारकऱ्यांबरोबरच या ठिकाणांना भेट देणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहेत.