पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह तीन अधिकारी उद्या रविवार (दि. 15) रोजी दुबईवारीसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा दौरा शुक्रवार (दि. 20) पर्यंत असणार आहे. या दौऱ्यामध्ये दुबईमध्ये विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास करण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्याबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
या दौऱ्यामध्ये आयुक्त सिंह यांच्यासह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांचा समावेश आहे. मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे सिटी सेंटर बांधण्यात येणार आहे. सिटी सेंटरच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीसाठी देशपातळीवर निविदा प्रसिध्द करण्यात आली. तीन वेळा निविदा प्रसिध्द करुनही केवळ एकच निविदा प्राप्त झाली. केपीएमजी ऍडव्हायझर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार एजन्सीची तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी नियुक्ती केली आहे. या सल्लगार संस्थेला 12 महिन्यांसाठी 2 कोटी 9 लाख रुपयांचे शुल्क देण्यात आले आहे.
महापालिकेने चिंचवड स्टेशन येथील डी मार्टजवळील 1 लाख 37 हजार 39.46 चौरस मीटर इतकी जागा पिंपरी – चिंचवड बिझनेस सेंटरसाठी आरक्षित केली आहे. महापालिकेस भरीव स्वरुपाचे आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर सिटी सेंटर बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सिटी सेंटरमध्ये कार्यालये, हॉटेल, करमणूक केंद्र, व्यापारी गाळे, बहुउद्देशीय हॉल, वाहनतळ आदी सुविधा असणार आहेत. नवी दिल्लीतील हेबिहाट सेंटर, मुंबईतील माइन्स स्पेस मालाड आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, हुस्टन सिटी अमेरिका, दुबई धर्तीवर हे सेंटर उभारले जाणार आहे.
दुबईमध्ये अत्याधुनिक पध्दतीने सिटी सेंटर उभारण्यात आली आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने दुबईतील सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे नियोजन केले आहे. मात्र, यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने अनेक अभ्यास दौरे झाले आहेत. अभ्यास दौऱ्यानंतर हे करू, ते करू अशा वल्गणा केल्या जातात. मात्र, तशा पध्दतीचे काम होताना दिसत नाही. त्यामुळे दुबई दौऱ्यातून खरचं काही साध्य होईल का? हा खरा प्रश्न आहे.
अतिरिक्त आयुक्तांकडे आयुक्तांचा कारभार?
महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. त्यामुळे दुबई दौऱ्यामुळे आयुक्त रविवार (दि.15) ते शुक्रवार (दि.20) पर्यंत असे सहा दिवस शहरात नसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त-1 प्रदीप जांभळे यांच्याकडे कारभार सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र रात्री उशीरापर्यंत त्याबाबतचे आदेश काढण्यात आले नव्हते.