पिंपरी – प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील बाजारपेठा, चौकाचौकांमध्ये तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध असल्याने शहर तीन रंगात रंगल्याचे दिसत आहे. तसेच शाळांमध्येही कवायतींसह, राष्ट्रभक्तीपर गीत सादरीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे.
शुक्रवारी (दि. २६) प्रजासत्ताकदिन साजरा होत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये तिरंगा ध्वज विक्रीसाठी असून, अनेकजण ते खरेदी करताना दिसत आहेत. तसेच शहरातील चौकांमध्ये ध्वज विक्रीसाठी दिसत आहेत. रस्त्याने जाताना चौकांतील सिग्नलवर थांबल्यावर अनेकजण या ध्वजाची खरेदी करताना दिसत आहेत.
काहीजण आपल्या वाहनांवर तर, काहीजण मुलांसाठी ध्वज खरेदी करत आहेत. तिरंगा बॅजही विक्रीसाठी असून, ५ रुपयांपासून त्याची किंमत आहे. बाजारपेठेत मोठे कापडी ध्वज विक्रीसाठी आहेत. हे ध्वज प्रामुख्याने शाळा, सरकारी कार्यालयांसाठी खरेदी होत आहे. बाजारपेठांमध्ये तिरंगा ध्वज सर्वत्र विक्रीसाठी दिसत आहेत.
शाळांमध्ये कवायती
प्रजासत्ताक दिनामित्त शाळांमध्ये ध्वजाला सलामी दिल्यानंतर कवायती सादर केल्या जातात. त्यामुळे विविध कवायती, कसरती, मल्लखांब आदींची तयारी शाळांमध्ये गुरुवारी (दि. २५) दिवसभर सुरू होती. अनेक शाळांमध्ये कवायतींचा सराव सुरू होता. शिक्षकही त्यांच्याकडून प्रात्यक्षिके करून घेताना दिसत होते. तसेच राष्ट्रभक्तीपर गीतांचे सादरीकण होते. त्यामुळे राष्ट्रभक्तीपर गीतांचाही सराव सुरू होता. त्यामुळे परिसरातील वातावरण भारावून गेले होते. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी ग्रुप करून राष्ट्रभक्तीपर गीते म्हणताना दिसत होती. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही तयारी सुरू होती.