पिंपरी (रवींद्र जगधने ) – राज्य शासनाने घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेचा अनेक जिल्ह्यांचा निकाल रखडला आहे. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपस्थित तलाठ्यांवर अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, या अधिकच्या कामामुळे तलाठ्यांवर ताण आला आहे. एका-एका तलाठ्यांना चार-चार कार्यालयांचे (सज्जा) कामकाज करावे लागत असल्याची परिस्थिती पिंपरी चिंचवड अपर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तलाठी कार्यालयांमध्ये आहे.
पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयाअंतर्गत अगोदर नऊ तलाठी कार्यालये होती. आता नव्याने २२ तलाठी कार्यालये निर्माण करण्यात आल्याने आता तलाठी कार्यालयांची संख्या ३१ झाली आहे. मात्र, आठ तलाठ्यांमार्फत या ३१ कार्यालयांचे कामकाज केले जात आहे. तर तलाठी वर्षा डावरे यांना रिंगरोडच्या कामसाठी उपविभागीय कार्यालयात स्थालांतरित केले असल्याने त्यांच्या कामाचा अतिरिक्त कार्यभार अतुल माने या तलाठ्यावर देण्यात आला आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड अपर तहसील कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे तलाठी नियुक्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अजूनपर्यंत या कार्यालयात राज्य शासनाकडून तलाठी देण्यात आलेले नाहीत.
तलाठी निकालाची स्थिती
गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा ३ भागांत आणि ५७ सत्रामध्ये घेण्यात आली. या परीक्षेस महाराष्ट्रातून तलाठी पदासाठी १० लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. रायगड, मुंबई उपनगर, कोल्हापूर, परभणी, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सातारा, अकोला, बीड, नागपूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, सांगली, बुलढाणा, लातूर, गोंदिया, हिंगोली, मुंबई शहर, सोलापूर, वाशिम, जालना, भंडारा आदी जिल्ह्यांचा निकाल जाहिर झाला आहे. तर या व्यतिरिक्त १३ जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
असा आहे कारभार
तलाठी – मूळ सज्जा – अतिरिक्त पदभार
कविता पाठक – रहाटणी – पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड
अतुल माने – निगडी – आकुर्डी, किन्हई, चिंचोली, चऱ्होली बु., निरगुडी, चोविसावाडी, वडमुखवाडी
सूर्यकांत काळे – देहू – विठ्ठलनगर, माळीनगर
वर्षा अरमाळकर – चिखली – तळवडे
पूनम शिंदे – भोसरी-१ – भोसरी-२, दोपोडी, दिघी, बोपखेल
सुरेखा लांडे – पिंपळे निलख – सांगवी
अतुल गिते – मोशी – डुडूळगाव, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी वाघेरे
रश्मी गालपेल्ली – रावेत – मामुर्डी, किवळे
प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयामार्फत प्रांत कार्यालयात रिक्त पदांचा अहवाल जातो. त्यानंतर प्रांत कार्यालयातून हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त पदांची माहिती असते. सध्या शासनाने तलाठी भरती परीक्षा घेतली असून, त्याचे काही जिल्ह्यांचे निकाल बाकी आहेत. लवकरच पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या सज्जांना तलाठी मिळतील.
– प्रवीण ढमाले, नायब तहसीलदार, पिंपरी चिंचवड अपर तहसील.