नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ग्लोबल कृषी प्रदर्शन गुरुवार (दि. 8) ते रविवार (दि. 11 फेब्रुवारी) दरम्यान दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वेळेत पाहण्यासाठी सर्वांसाठी खुले असणार आहे. कृषी प्रदर्शन शेतकर्यांना जागतिक दर्जाच्या कृषी तंत्रज्ञानाची माहिती पुरवून ग्लोबल बनविणारे ठरेल, असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी व्यक्त केला.
ग्रामोन्नती मंडळाचे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि शुअर शॉट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कृषी संशोधन परिषद, नाबार्ड, पिडीसीसी बँक, एन.एच.बी, आरसीएफ, आत्मा कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद पुणे, द बाप कंपनी यांच्या सहकार्याने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.29) या कृषी प्रदर्शनाच्या महामंडपाचे भूमिपूजन ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे यांच्या हस्ते झाले त्यावेळी मेहेर बोलत होते.
याप्रसंगी उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपाध्यक्ष सुजित खैरे, संचालक शशिकांत वाजगे, रत्नदीप भरवीरकर, तानाजी वारुळे, डॉ. संदीप डोळे, एकनाथ शेटे, डी. के. भुजबळ, ऋषिकेश मेहेर, केंद्राचे प्रमुख डॉ, प्रशांत शेटे, शास्रज्ञ राहुल घाडगे, योगेश यादव, धनेश पडवळ, भारत टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या भव्य प्रक्षेत्रावर शेतकरी, महिला शेतकरी, विद्यार्थी, कृमी उद्योजक, कृषी सेवा पुरवठादार यांच्यासमोर प्रगतीच्या अगणित सुवर्णसंधी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून खुल्या होणार आहेत. एक लाखाहून अधिक शेतकरी प्रदर्शनास उपस्थित राहण्याचा अंदाज असून कृषी प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेहेर यांनी केले.
कृषी प्रदर्शनाचे आकर्षण
ग्लोबल कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे 200 एकर क्षेत्र, प्रक्षेत्रावरील शिवार फेरी, शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केलेली 50 पेक्षा अधिक पीक प्रात्यक्षिके, प्रदर्शनाच्या महामंडपात राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी ज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनात अग्रेसर असलेल्या 250 पेक्षा अधिक राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या, शासकीय अशासकीय विभागांचा, संस्थांचा सहभाग, नवीन खते, औषधे, वियागे, यंत्र, अवजारे, उपकरणे, शेतमाल विक्री, करार शेती, शेतकर्यांच्या दिमतील उभ्या असलेल्या स्वयंसेवी संस्था यासह शेतकर्यांना ग्लोबल होण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे कृषी तंत्रज्ञान सादरीकरण प्रदर्शनातून शेतकर्यांना पहावयास मिळणार आहे.
कृष्णी सन्मान पुरस्काराचे वितरण
शेळीपालन, कृषीव्यवसाय, विविध शेतीपूरक जोडधंदे, कांदा, टोमॅटो, शेतकरी उत्पादक कंपनी शासकीय योजना, मूल्यवर्धन, प्रक्रिया, उत्पादन ते विक्री, हायटेक शेती तंत्रज्ञान, अनेक विषयांवरील पीक परिसंवाद, शेतकर्याना आर्थिक विकासाला नवी दिशा देणार्या चर्चासत्रांचे आयोजन, शेतीत उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण गोष्टी जगासमोर आणणारा कृषी पत्रकार, मार्गदर्शन करणारा कृषी विस्तार कार्यकर्ता यांना ग्रामोन्नती कृषी सन्मानाने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.