पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या 433 अनधिकृत होर्डिंग व्यतिरिक्त 72 नव्याने होर्डिंग आढळून आले आहेत. यापैकी 37 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले आहेत. तर 35 होर्डिंग दोन दिवसांत काढण्यात येणार असल्याची माहिती आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच न्यायालयात प्रलंबित याचिकेच्या अधिन राहून अनधिकृत फलकधारक व अधिकृत फलकधारकांना लायसन्स प्राप्त संरचना अभियंत्याचे संरचना मजबुतीचे (स्थिरतेचे) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसून दिलेल्या मुदतीमध्येच प्रमाणपत्र सादर करावे, असेही आकाश चिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
किवळे दुर्घटनेनंतर अनधिकृत जाहिरात फलक व अधिकृत फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट, राज्य सरकारचे जाहिरात धोरणाची अंमलबजावणी करण्यासह अनधिकृत होर्डिंग काढून घेण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. त्यानुसार आयुक्तांनी शहरातील होर्डिंग धारकांची तत्काळ बैठक घेतली. तसेच अत्यंत कडक शब्दांत होर्डिंग धारकांना समज देऊन आकाश चिन्ह विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत.
शहरात न्यायालयात प्रलंबित असलेल्या 433 अनधिकृत होर्डिंग व्यतिरिक्त 72 नव्याने होर्डिंग आढळून आले आहेत. यापैकी रविवार अखेर 33 होर्डिंगधारकांनी स्वतःहून तर 4 होर्डिंग पालिकेच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आले आहेत. उर्वरित 35 होर्डिंग येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले आहे.
न्यायालयात प्रलंबित असलेल्या होर्डिंग व्यतिरिक्त शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग तत्काळ जमीनदोस्त करण्याचे आदेश आकाश चिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत. त्यानुसार परवाना निरीक्षक हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील अतिक्रमण निर्मूलन पथक यंत्र सामूग्रीसह होर्डिंगवर कारवाई करत आहे. तसेच किवळे येथील घडलेली दुर्घटना उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. मात्र, न्यायप्रविष्ट होर्डिंग्ज धारकांनी स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहेच.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
या भागातील अनधिकृत होर्डिंग हटविले
मुंबई-बेंगलोर महामार्ग, पुनावळे, पुनावळे रोड, ताथवडे, हिंजवडी, वाकड रोड, कासारवाडी, देहू-मोशी रोड, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी, विनोदे वस्ती, मारुंजी, कस्पटे वस्ती, लोंढे वस्ती, किवळे यासह आदी भागातील 37 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले आहेत.