पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचे रुग्ण दिवाळीनंतर पुन्हा वाढू लागले असून, 24 तासांत पुन्हा 200 नव्या रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा 92 हजार 159 इतका झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शनिवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (रविवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 192 जणांना करोनाची लागण झाली असून शहराबाहेरील 8 जणांचा करोना अहवाला सकारात्मक आला आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण शहरातील रहिवासी होते. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1628 वर पोहोचला असून शहराबाहेरील 668 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 2296 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश असून शहरातील सांगवी, पिंपरी आणि देहूरोड येथील हे रहिवासी होते. आतापर्यंत शहरातील 88 हजार 179 जण करोनामुक्त झाले असून शहराबाहेरील 7032 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.
आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1757 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 2561 जण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत 4 लाख 70 हजार 336 जणांची टेस्ट करण्यात आली आहे.