पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने 168 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांचा कालावधी सहा महिने असणार आहे. त्यासाठी तब्बल 16 हजार अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये साडेसात हजार अर्ज हे कनिष्ठ अभियंता या पदासाठी आले आहेत.
महापालिकेने पशुवैद्यकीय अधिकारी 4, उद्यान अधिकारी 8, सहायक उद्यान अधिकारी 8, कनिष्ठ अभियंता 32, सुपरवायझर 20, परवाना निरीक्षक 4, निरीक्षक 16, आरोग्य सहायक 16, लाईव्हस्टॉक सुपरवायझर 4, ऍनिमल कीपर 4, माळी 52 असे एकूण 168 पदांची कंत्राटी पद्धतीने 6 महिन्यांसाठी भरती काढली आहे. त्यासाठी 17 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
मात्र, शेवटच्या दोन दिवसात सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेकांना अर्ज अपलोड करता आले नाहीत. नोंदणी केलेल्या मात्र, अर्ज भरू न शकलेल्या उमेदवारांना शुक्रवार (दि.24) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये तब्बल 16 हजार अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत.
32 कनिष्ठ अभियंता पदांसाठी सर्वांधिक 7 हजार 381 अर्ज आले आहेत. सुपरवायझरसाठी 2 हजार 005, परवाना निरीक्षकांसाठी 1 हजार 587, निरीक्षक पदासाठी 1 हजार 90, आरोग्य सहायक पदासाठी 1 हजार 199, माळी पदासाठी 1 हजार 358, सहायक उद्यान अधिकारी पदासाठी 921, पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी 38, उद्यान अधिकारी पदासाठी 250, लाइव्ह स्टॉक सुपरवायझरसाठी 229, ऍनिमल कीपरसाठी 66 अर्ज प्राप्त झाले आहेत.
यामध्ये सर्व अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जांची गुणांनुसार छाननी केली जाणार आहे. त्यानंतर एका पदासाठी तीन या प्रमाणे अर्जदारांना प्रत्यक्षात बोलविण्यात येईल. त्यामध्ये त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या कागदपत्रांची व प्रत्यक्ष असलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. ज्यांचे कागदपत्रे चुकीचे किंवा डुप्लीकेट आढळल्यास त्यांना बाद केले जाईल. त्यापुढील उमेदवाराला त्याच्या गुणांकानुसार संधी देण्यात येईल.
महापालिकेच्या वतीने 168 पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 16 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्जांची छाननी करून गुणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. यामध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. येत्या दहा दिवसांमध्ये ही सर्व प्रकिया पूर्ण होईल.
– राजेश आगळे, सहायक आयुक्त.