दादा, हाताला काम अन्‌ शेताला पाणी द्या…

टेंभू, तारळी, उरमोडीची प्रतीक्षा संपवा; भूमिपुत्रांच्या हाकेला साद द्या

प्रशांत जाधव
सातारा – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या, दि. 25 रोजी खटाव-माण तालुक्‍यांच्या दौऱ्यावर येत आहेत. जम्बो कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते येत असले तरी त्यांच्याकडून तेथील जनतेला खूप अपेक्षा आहेत.

राज्याचा दादा नेता तालुक्‍यात येत असून, येथील लोकांच्या हातांना काम आणि शेतीला पाणी देण्यासाठी ठोस घोषणा करा. टेंभू, तारळी, उरमोडीच्या पाण्याची प्रतीक्षा करून थकेलेल्या भूमिपुत्रांच्या हाकेला साद द्या, तरच हा दौरा कारणी लागेल, अन्यथा दौऱ्याच्या केवळ बातम्या छापून येतील आणि इथल्या मातीचे प्रश्न कायम राहतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक पिढ्या दुष्काळाचा कलंक लागलेल्या खटाव-माण तालुक्‍यातील तरुण शेतात कष्ट करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी झटत आहेत. त्यांना परिस्थिती साथ देत नसल्याने ही तरुण मंडळी पुणे, मुंबईत इतरांची घरे रगंवण्याची कामे करत आहेत. देशात आणि महाराष्ट्रात असे कोणतेही क्षेत्र नाही की, त्यात या तालुक्‍यातला युवक काम करत नाही. या कामांमुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटू शकतो, पण भटकंती थांबत नाही.

त्यामुळे अजितदादांनी पुढाकार घेऊन दोन्ही तालुक्‍यांमध्ये औद्योगिक वसाहतीची घोषणा करून, ती पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. तारळी, उरमोडी, टेंभू पाणी योजनांचा आढावा घेऊन, घोडं नेमकं कुठं पेंड खातंय, हे शोधावे. त्याशिवाय पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या माणसांना स्थैर्य लाभणार नाही. पाण्यासाठी पूर्वजांनी सोसलेल्या हालअपेष्टा स्मरणात ठेवून जगणाऱ्या तरुणांसाठी अजितदादांनी आश्वासक घोषणा कराव्यात. कारण, या दोन्ही तालुक्‍यांनी कायम अजितदादांची पाठराखण केली आहे.

तरुणांमधील असंतोष शमवा
या दोन्ही तालुक्‍यांमधील तरुण वर्ग सोशिक असून, तो परिस्थितीशी सामना करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे; परंतु आता तरुणांची सहनशीलता संपत चालली आहे. त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या तालुक्‍यांसाठी वरदायीनी ठरू शकणाऱ्या टेंभू, तारळी, उरमोडी, जिहे-कठापूर योजना मार्गी लावून, तरुणांच्या हातांना रोजगार द्यावा. त्यामुळे तरुणांमधील असंतोष शमेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.