नवी दिल्ली – कनिका ढिल्लो ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची लेखिका आणि निर्माती आहे. आंतरराष्ट्रीय सिने मॅगझीनच्या कव्हरवर अलीकडेच तिचा फोटो छापून आला आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय सिने मॅगझीनच्या कव्हरवर एखाद्या लेखिकेचा फोटो छापून येण्याच ही पहिलीच वेळ आहे.
हा मान मिळवणारी कनिका ही पहिलीच भारतीय लेखिका ठरली आहे. जर्मन मॅगझीन “इश्क’च्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर तिचा फोटो छापला गेला आहे. चांदीचे दागिने आणि पांढऱ्या शुभ्र पोषाखात ती अगदी छान दिसते आहे. या संदर्भात सोशल मीडियावर तिने एक पोस्ट केली आहे.
एखाद्या पटकथा लेखिकेचा फोटो आंतरराष्ट्रीय सिने मॅगझीनच्या मुखपृष्ठावर छापला जातो. तेंव्हा लेखकांच्या श्रेणीचाच सन्मान होतो, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. कनिका ढिल्लोंने यापूर्वी “हसीन दिलरुबा’ आणि “मनमर्जियां’ सारख्या सिनेमांच्या पटकथेचे लेखन केले आहे.
याशिवाय तिच्या “बॉम्बे डक इज ए फिश’, “शिवा ऍन्ड द राईज ऑफ द शॅडो’ आणि “द डान्स ऑफ दुर्गा’ या तीन कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत. यातील “बॉम्बे डक…’ हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीवरील विनोदी प्ररसन आहे.